नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसंदर्भात सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत कोणताही बदल करण्याचा प्रस्ताव नाही. तशा प्रकारचा कोणाताही बदल केला जाणार नाही. लोकसभा खासदार बंशीलाल महतो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर देताना लोक तकक्रारनिवरण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल करण्याचा सरकारचा काही विचार आहे का? असा सवाल बंशीलाल महतो यांनी विचारला होता.
दरम्यान, महतो यांच्या प्रश्नावर लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरात मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, वर्ष २०१३ मध्ये केंद्री कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत मंजूरी देण्यात आली होती. तेव्हा, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६२ होऊ शकते अशी चर्चा होती. असे झाल्यास कर्मचाऱ्य़ांना फायदा होऊ शकतो. पण, सरकारने याला साफ नकार दिला आहे.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढविण्याऐवजी कमी करण्याच्याही बातम्या आल्या होत्या. त्यावेळी कर्मचाऱ्यांची सातत्याने वाढत जाणारी पगार आणि पेन्शनची रक्कम आणि त्यामुळे वाढणारा खर्च या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन सरकार हा विचार करत असल्याची चर्चा होती. तसेच, या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसाठी वयाची अट ६० वरून ५८ वर्षांवर आणण्याचीही चर्चा होती. पण, असा कोणताही विचार नसल्याचे सांगत या चर्चेलाही सरकारने पूर्ण विराम दिला.