एमजीआर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येणार पाच आणि शंभर रुपयांची नाणी

दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकार शंभर रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे.

Updated: Sep 13, 2017, 04:01 PM IST
एमजीआर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येणार पाच आणि शंभर रुपयांची नाणी  title=

नवी दिल्ली : दोनशे रुपयांची नवीन नोट चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकार शंभर रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाचे संस्थापक भारतरत्न एम.जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सरकारने शंभर रुपये आणि पाच रुपयाचं नवीन नाणं चलनात आणण्याचं ठरवलंय.

आर्थिक व्यवहार सुलभ करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. शंभर रुपयाच्या नाण्याचं वजन 35 ग्रॅम तर पाच रुपयाच्या नाण्याचं वजन 5 ग्रॅम असेल. नाण्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबं, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्त या धातूचा वापर करण्यात येईल.

सध्या बाजारात 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी चलनात आहेत. त्यात आता 100 रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे. एम.जी. रामचंद्रन यांनी 1972 साली द्रविड मुनेत्रे कळघम अर्थात द्रमुक या पक्षातून बाहेर पडून अण्णा द्रमुक पक्षाची स्थापन केली.

1977, 1980 आणि 1984 साली एमजीआर यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. 1989 साली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं.