Coronavirus : ....या क्रमांकावरुन फोन आल्यास दुर्लक्ष करु नका

असा फोन आल्यास....

Updated: Apr 22, 2020, 05:39 PM IST
Coronavirus : ....या क्रमांकावरुन फोन आल्यास दुर्लक्ष करु नका title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : Coronavirus कोरोना विषाणूच्या प्रसाराचा एकंदर वेग पाहता भारतात चिंतेच्या वातावरणात दिवसागणिक भर पडत आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा विषाणू आणखी फोफावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्यामुळे आता या विषाणूशी दोन हात करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडून आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. हे पाऊल म्हणजे एका राष्ट्रव्यापी सर्व्हेचं. 

'फेक कॉल'मुळे त्रस्त असाल आणि अनोळखी क्रमांकांवरुन येणारे फोन न उचलण्याची सवय तुम्हाला असेल तर, ही बाब जरुर वाचा. कारण, १९२१  या क्रमांकावरुन आलेला फोन टाळून चालणार नाही. 

हा आहे केंद्र सरकारचा नंबर 

१९२१ या क्रमांकाच्या माध्यमातून तुमची आरोग्यविषयक माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये तुमचं नाव आणि पत्ताही विचारला जाणार आहे. शिवाय तुमच्या परदेश प्रवासाची माहितीसुद्धा घेतली जाणार आहे. तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती किंवा कोणी नातेवाईक कोरोनाबाधित तर, नाही ना? असेही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 

 

सामूहिक लागण सुरु झाली आहे की नाही, याबाबतची पडताळणी सुरु... 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची सामुहिक लागण, सामुहिक प्रसार होण्या सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे. पण, अधिकृतरित्या हाती आलेले आकडे पाहता अद्यापही 'कम्युनिटी ट्रान्समिशन' सुरु झालं नसल्याचीच बाब समोर येत आहे. पण, या दूरध्वनीच्या माध्यमातून व्हायरस नेमका कुठवर पोहोचला आहे, याचा अंदाज लावण्यास यंत्रणेला फायदा होणार आहे.