देशात कोरोनाबाबत केंद्र सरकार गंभीर, 4 डिसेंबरला बोलावली सर्व पक्षांची बैठक

केंद्र सरकारने बोलवली सर्व राजकीय पक्षांशी महत्त्वाची बैठक

Updated: Nov 30, 2020, 03:48 PM IST
देशात कोरोनाबाबत केंद्र सरकार गंभीर, 4 डिसेंबरला बोलावली सर्व पक्षांची बैठक title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे काही राज्यांमध्ये पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारे याबाबत खबरदारी घेत आहेत. हे पाहता, केंद्र सरकार पुढील महिन्यात सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेणार आहे. राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व सदस्यांसोबत 4 डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या काळात कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली जाईल.

देशात आणि जगात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. रविवारी कोरोनाचे 41,810 रुग्ण वाढले होते. सोमवारी 38,772 नवीन रुग्ण वाढले. तर 443 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना संक्रमणाची संख्या 94 लाखांवर गेली आ हे. जगात कोरोना संक्रमणाची संख्या 6,30,72,475 वर गेली आहे. जगात आतापर्यंत 14,65,181 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4,35,45,829 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

कोविड-19 संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे 4 डिसेंबरला सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, 'मी अलिकडच्या काळात रुग्णालये / नर्सिंग होममध्ये आग लागल्याच्या घटनांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. अधिकाऱ्यांनी अग्निसुरक्षा उपायांचे पालन न करणे ही चिंतेची बाब आहे.

गृहसचिव पुढे म्हणाले, 'नुकतीच राजकोट येथील कोविड रुग्णालयात आग लागल्याने 6 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर अहमदाबादमधील रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला. भारत कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे, तेव्हा अशा घटना टाळण्यासाठी आपण अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.'