नवी दिल्ली : टेक्नोलॉजी कंपनी गूगलने Google कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गूगलचे कर्मचारी आता आठवड्यातून तीन दिवस सुट्टी घेऊ शकणार आहेत. कंपनीने, आपल्या कर्मचाऱ्यांना खास काळजी घेण्यासाठी आणि कामाचा ताण काहीसा कमी करणाच्या उद्देशाने, आठवड्यातून तीन दिवसांच्या सुट्टीची घोषणा केली आहे. या विकली ऑफचा week off फायदा इंटर्नलाही मिळणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारीही गूगलच्या कर्मचाऱ्यांना विकली ऑफ घेता येणार आहे.
कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी एक इंटरनल मेसेज जारी करण्यात आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, कंपनी कोरोना व्हायरसच्या कठिण काळात, कर्मचाऱ्यांचं धैर्य वाढवू इच्छित आहे. त्यासाठी मॅनेजर्सने आपल्या टीमला प्रोत्साहन देऊन, या नव्या व्यवस्थेनुसार कर्मचाऱ्यांच्या कामाची जबाबदारीदेखील निश्चित करावी.
त्याशिवाय, कर्मचाऱ्याला शेवटच्या क्षणी कामं करावं लागलं, तर मॅनेजर त्या दिवसाऐवजी कर्मचाऱ्याला दुसऱ्या दिवशी सुट्टी देऊ शकेल, अशीही तरतूद करण्यात आली आहे. कंपनीने असंही स्पष्ट केलं आहे की, टेक्निकल व्यक्ती शुक्रवारी सुट्टी घेऊ शकत नाही. परंतु या कर्मचाऱ्यांना ही सुट्टी कशी दिली जाईल, यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
गूगलच्या या नव्या व्यवस्थेची इंटरनेटवर मोठी चर्चा सुरु आहे. त्याशिवाय अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी, आपल्या कंपन्यांमध्ये अशाचप्रकारची पावलं उचलण्याची मागणी केली आहे.