रेल्वेचा मोठा निर्णय । तिकिट बुकिंग काउंटर आजपासून सुरु, एजंटसुद्धा तिकिटे बुक करु शकतात

रेल्वे  तिकिट बुकिंग काउंटर उघडण्याचे रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्याबाबतचे संकेत दिले आहेत. 

Updated: May 22, 2020, 07:59 AM IST
रेल्वेचा मोठा निर्णय । तिकिट बुकिंग काउंटर आजपासून सुरु, एजंटसुद्धा तिकिटे बुक करु शकतात title=

मुंबई : रेल्वे  तिकिट बुकिंग काउंटर उघडण्याचे रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्याबाबतचे संकेत दिले आहेत. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि एजंटला तिकिट बुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या जनरल व्यवस्थापकांना आज शुक्रवारपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व जनरल व्यवस्थापकांना गरजेनुसार आरक्षण काउंटर कुठे उघडायचे ते ठरविण्यास सांगितले आहे. तथापि, रेल्वेने स्पष्ट केले आहे की कामगार गाड्यांच्या प्रवाशांचे नियंत्रण अद्याप संबंधित राज्यांच्या ताब्यात राहील.

शुक्रवारी देशभरातील जवळपास १.७ लाख 'कॉमन सर्व्हिस सेंटर'वर रेल्वेचे तिकिटांचे बुकिंग पुन्हा सुरु केले जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. 'कॉमन सर्व्हिस सेंटर' ही ग्रामीण आणि दुर्गम ठिकाणी सरकारची ई-सेवा देणारी केंद्रे आहेत. ही केंद्रे अशा ठिकाणी आहेत जिथे संगणक आणि इंटरनेटची उपलब्धता कमी किंवा नाही.  येत्या दोन ते तीन दिवसांत काउंटरवरील काही स्थानकांवरही बुकिंग सुरु होईल, असेही रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तिकीट बुकींगसाठी आरक्षित खिडक्या किती खुल्या करायचा याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा असल्याचंही रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सामान्य स्थिती करण्यावर भर

देशात सामान्य स्थिती करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे काउंटर उघडता येतील अशी स्टेशन ओळखण्यासाठी आम्ही एक प्रोटोकॉल बनवत आहोत. काउंटरवर मोठ्या संख्येने लोक तिकिट बुक करण्यासाठी जमले नाहीत याची खात्री करुन घ्यावी लागेल, म्हणून आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत आणि त्यासाठी एक प्रोटोकॉल बनवत आहोत, असे रेल्वे मंत्री गोयल म्हणालेत.

 लवकरच आणखी गाड्यांची घोषणा 

 १ मेपासून श्रमिक स्पेशल गाड्या सुरु केल्यापासून रेल्वेने २,०५० गाड्या चालवल्या असून सुमारे ३० लाख प्रवासी, विद्यार्थी आणि इतर अडकलेल्या लोकांची वाहतूक केली गेली आहे. रेल्वेमंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे कामगार-विशिष्ट गाड्या चालविण्यात रेल्वेला मदत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि सहकार्य न केल्याबद्दल पश्चिम बंगाल आणि झारखंडवर टीका केली. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये  केवळ २७ रेल्वे गाड्या धावू शकल्या आहेत आणि आठ आणि नऊ मेपर्यंत तेथे फक्त दोन गाड्या पोहोचू शकल्या आहेत. झारखंडमध्ये ९६ गाड्या चालविण्यात आल्या असून राजस्थानमध्ये आतापर्यंत ३५ गाड्या धावल्या गेल्या आहेत, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली.