सोन्याचे दर विक्रमी उंचीवर; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव

 सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Updated: Jul 22, 2020, 10:41 AM IST
सोन्याचे दर विक्रमी उंचीवर; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. मंगळवारी बाजार सुरु होतानाच सोन्याचे दर चढे होते, मात्र संध्याकाळपर्यंत सोन्याचे दरात आणखी वाढ होऊन ऐतिहासिक 49,579 रुपये प्रति 10 ग्रॅम उच्चांक गाठला आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचा दर 93 रुपयांच्या वाढीसह 49,120 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. परंतु संध्याकाळपर्यंत सोन्याच्या किंमती वाढून 49,500 रुपयांवर पोहचल्या. त्यानंतरही दरवाढ सतत होत होती. काही वेळातच सोन्याचे दर आणखी वाढून ते विक्रमी 49,579 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 39 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. मात्र पुढील सहा महिन्यात सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ पाहायला मिळाली. गेल्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीत जवळपास 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सोन्यासह, चांदीच्या किंमतीतही वाढ होत आहे. मंगळवारी संध्याकाळी चांदीचा 56,881 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या वाढीमुळे, भारतीय बाजारात चांदीचा भाव सप्टेंबर 2013 नंतर पहिल्यांदाच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहचल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCXवर दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 52000 रुपयांपर्यंत पोहचू शकतात, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात आला आहे.

कोरोनाचा कहर अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करत आहे. कोरोनामुळे जागतिक आर्थिक बाजारात, शेअर मार्केटमध्येही अनिश्चिततेचं वातावरण आहे. देशात, जगभरात आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांची, गुंतवणूकीसाठी पहिली पसंती सोन्यालाच असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.