Gold Rates Today: सोन्या चांदीच्या दिवसांत सातत्याने वाढ होत आहे. नवरात्रौत्सवास सुरुवात झाली आहे. काहीच दिवसांत दसरादेखील येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीदेखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव 120 रुपयांनी वाढले आहेत. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, लखनौ, जयपूर, मुंबई, कोलकातासारख्या ठिकाणी मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तर, चांदीचे दरही वधारले आहेत. आज चांदीचे दर 94,900 रुपयांवर स्थिरावले आहेत.
दसऱ्याला सोनं खरेदी करण्याची भारतात प्रथा आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. मात्र यंदा दसऱ्याला सोनं खरेदी करणे खूप खर्चिक होणार आहे. कारण दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव 80 हजारांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर जवळपास 77,830 रुपये प्रतितोळा इतके आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर जवळपास 71,360 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत.
दिवाळीनंतर लग्नासराईच्या दिवसांना सुरुवात होणार आहे. याकाळत दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. पण मौल्यवान धातुच्या दरात होणारी वाढ पाहून ग्राहकही चिंतेत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोनं-चांदी यांवरील कस्टम ड्युटी कमी केली होती. मात्र तरीही सोन्याचे दर कमी होण्याचे अद्याप काही चिन्हे नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळंही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,680 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,210 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.