गोव्याच्या जोशुआ डिसुझाची का होतेय आर आर पाटील यांच्या रोहितशी तुलना?

निवडणूक गोव्याची चर्चा मात्र सांगलीच्या आर आर पाटील यांची 

Updated: Feb 10, 2022, 10:12 AM IST
गोव्याच्या जोशुआ डिसुझाची का होतेय आर आर पाटील यांच्या रोहितशी तुलना? title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पणजी : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर आबा अर्थात आर आर पाटील  यांचे सुपुत्र रोहित पाटील  यांच्याविरोधात नगर पंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकवटल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात  रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत  निवडणुक ही त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली झाली होती.

दरम्यान, सर्व विरोधकांना अस्मान दाखवत रोहित पाटील यांच्या नेतृत्वात कवठे महाकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं  एक हाती सत्ता मिळवली.

नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा आणि शेतकरी विकास आघाडी ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले. सांगलीतील या चुरशीच्या निवडणुकीत रोहित पाटील यांनी राजकारणात दमदार एंट्री केली.

दरम्यान, अशीच एक लढत गोवा निवडणुकीत होत असून भारतीय जनता पक्षाचे म्हापसा येथील उमेदवार जोशुआ डिसुझा विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटल्याचे दिसत आहे.

रोहित पाटील यांच्या प्रमाणेच जोशुआ हे देखील अत्यंत तरुण असे नेते आहेत. रोहित यांचे वय अवघे २३ वर्षे आहे तर जोशुआ यांचे वय अवघे ३३ वर्षे आहे.

जोशुआ हे देखील रोहित पाटील यांच्या प्रमाणेच मोठा राजकीय वारसा लाभलेल्या परिवारातून येतात.

जोशुआ हे भाजपचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. आर आर पाटील यांचे जसे मोठे नाव आहे.

तसेच फ्रान्सिस डिसुझा यांचे गोव्यात मोठे नाव आहे. फ्रान्सिस डीसुझा यांच्या निधनानंतर २०१९ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांचा विजय झाला.

सध्याच्या परिस्थितीत बार्देशचे माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार मायकल लोबो यांच्या काँग्रेस प्रवशामुळे येथील राजकीय गणिते बदलली आहेत.

मायकल लोबो यांनी सध्याच्या घडीला बार्देश तालुक्यात भाजपला तगडे आव्हान दिले आहे. केवळ कॉंग्रेसच नव्हे तर तृणमूल,शिवसेना, आप आदी पक्ष देखील जोशुआ यांचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

रोहित पाटील यांच्यावर टीका करताना विरोधकांनी निवडणुकीत त्यांचा बाप काढला होता. तसेच रोहित यांना बालिश ठरवलं होतं. अगदी तशीच टीका सध्या विरोधकांकडून जोशुआ यांच्यावर केली जात आहे.

मात्र विरोधकांच्या टीकेला न जुमानता जोशुआ हे अतिशय नम्रपणे जनतेच्या समोर नतमस्तक होत मतांचा आशीर्वाद मागत आहेत. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांवर आकस्मिक राजकीय जबाबदारी पडली अगदी तशीच परिस्थिती जोशुआ यांच्याबाबत देखील आहे.

दरम्यान, कवठेमहांकाळ नगरपंचायतीत एकहाती सत्ता मिळवल्याने रोहित पाटील यांच्या नेतृत्वावर कर्तृत्वाची मोहोर उमटली आहे.

आता जोशुआ हे देखील अशीच पुनरावृत्ती म्हापसा मतदारसंघात करणार का हे पाहणे औत्सुक्याचा विषय असणार आहे.