PHOTO : आजाराशी झुंजणारे मनोहर पर्रिकर सचिवालयात येतात तेव्हा...

काम आणि जबाबदारीप्रती निष्ठा असावी तर अशी....

Updated: Jan 1, 2019, 02:35 PM IST
PHOTO : आजाराशी झुंजणारे मनोहर पर्रिकर सचिवालयात येतात तेव्हा... title=

मुंबई : आजाराशी दोन हात करत असणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिलेलं नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केलेले फोटो पाहता हे लक्षातच येत आहे. गेल्या चार महिल्यांमध्ये पहिल्यांदाच पर्रिकर यांनी पोर्वोरिम येथे असणाऱ्या गोव्याच्या राज्य सचिवालयाला भेट दिली. आजारपणातही आपल्या कामाप्रती आणि जबाबदारीप्रती एकनिष्ठ असणाऱ्या पर्रिकरांची ही कृती खरंच अनुकरणीय आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सचिवालयाच्या दारापाशी एक कार आली. पर्रिकर त्यातून खाली उतरले आणि उपस्थितांना पाहून स्मितहास्य करत ते सचिवालयात गेले. त्यावेळी तेथे उपस्थित शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नावाच्या उत्स्फूर्त घोषणा करण्यास सुरुवात केली. 

गोव्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी पर्रिकर यांनी काही खात्यांच्या अधिकाऱ्यांची सभा घेतली असून, यात रोजगार संधी, बढती, बदली अशा तातडीने लक्ष घालण्याची गरज असणाऱ्या विषयांवर चर्चा केली. त्यांनी यावेळी त्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली.

२०१८ मधील फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्यावर पेनक्रेटीक कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. या आजारावर त्यांनी सुरुवातीला मुंबईतील लीलावती रुग्णालयात आणि त्यानंतर दोन वेळा परदेशात जाऊन उपचार घेतले होते. ज्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. पण, तरीही त्यांची प्रकृती खालावल्याचं त्यांच्या या छायाचित्रांवरुन कळत आहे.