Ganeshotsav 2023 : काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या गणेशोत्सवाला आता दर दिवसागणिक नव्यानं रंगत येताना दिसत आहे. अशा या गणेशोत्सवाची धूम फक्त मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या परिनं लाडक्या बाप्पाच्या सेवेत रमला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यातच काही पुरातन मंदिरांनीही गणेश भक्तांचं लक्ष वेधलं आहे.
देवादिदेव महादेवाच्या काशीनगरीमध्येही असंच एक पुरातन गणेश मंदिर आहे, तुम्हाला माहितीये? लोहटिया बडा गणेश, असं या गणपती मंदिराचं नाव. इथं असणारी गणेशमूर्ती स्वयंभू असून ही त्रिनेत्र मूर्ती आहे असं सांगितलं जातं. काशीतील लोहटिया याच ठिकाणी हे मंदिर उभं असल्यामुळं त्याला लोहटिया गणेश मंदिर असंही म्हटलं जातं. काहींसाठी हा बाप्पा आहे, बडा गणेश.
असं सांगितलं जातं की, काशीनगरीत असणारं हे गणपतीचं मंदिर 40 स्तंभांवर उभं आहे, ज्यामुळं त्याची स्थापत्यशैली कायमच सर्वांचं लक्ष वेधते. मंदिरात गणपती बाप्पा त्यांच्या अर्धांगिनी रिद्धी-सिद्धी आणि पुत्र शुभ-लाभ यांच्यासह विराजमान आहेत.
इथं अशा मान्यता आहे की बाप्पाच्या या रुपाची मनोभावे पुजा केल्यामुळं व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. या मंदिरात बंद दाराआड होणाऱ्या पुजेचं फार महत्त्वं आहे. इथं बंद दाराआड पुजा होत असताना कोणालाही आतमध्ये डोकावण्याची परवानगी नसते. असं करणं अशुभ मानलं जातं.
मान्यता आणि धारणा...
अनेकांच्या धारणेनुसार आणि हिंदू धर्मातील मान्यतांनुसार काशीतून गंगेसोबतच मंदाकिनी नदीसुद्धा वाहत होती. त्याच वेळी कैक वर्षांपूर्वी गणपतीची ही प्रतिमा या नदीच्या पात्रात सापडली होती. ज्या दिवशी मूर्ती सापडली तेव्हा माघ महिन्याती संकष्ट चतुर्थी होती. त्या दिवसापासून दरवर्षी इथं मोठ्या उत्सवाचं आयोजन केलं जातं. काशीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक इथल्या भक्तिमय वातावरणाशी एकरुप होताना दिसतात. त्यामुळं तुम्हाला कधी इथं येण्याची संधी मिळाली, तर या गणपती मंदिराला नक्की भेट द्या.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)