देशांतर्गत विमान प्रवासासाठीही सरकारी ओळखपत्र सक्तीची शक्यता!

 देशांतर्गत विमान प्रवास करायचा असल्यास तर आता सरकारी ओळखपत्र बाळगणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 7, 2017, 01:34 PM IST
 देशांतर्गत विमान प्रवासासाठीही सरकारी ओळखपत्र सक्तीची शक्यता!  title=

मुंबई :  देशांतर्गत विमान प्रवास करायचा असल्यास तर आता सरकारी ओळखपत्र बाळगणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे.

लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. 

भारतामध्ये देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणे बंधनकारक केले जाईल. भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’तयार केली जाईल. त्याबाबतच हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली आहे. 

इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम आहे. या नव्या नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकीटावर दुसरा व्यक्ती प्रवास कऱण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे झालेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचे जयंत सिन्हा यांनी  सांगितले आहे.

नो फ्लायच्या नियमांबाबत प्रवाशांनीही काही सूचना केल्या होत्या. त्याबाबत विचार करुन देशांतर्गत प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आल्याचेही सिन्हा यांनी सांगितले आहे. यासोबत देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकिट काढताना आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या प्रवाशांना लवकर डिजिटल बोर्डिंग पास देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.