रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची महिलांना अनोखी भेट

आम आदमी पक्षाच्या सरकारसाठी महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे

Updated: Aug 15, 2019, 04:56 PM IST
रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची महिलांना अनोखी भेट  title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं एक महत्त्वाची घोषणा केलीय. २९ ऑक्टोबरपासून डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये महिला मोफत प्रवास करू शकतील, असं त्यांनी घोषित केलंय. छत्रसाल स्टेडियममध्ये स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं दिल्ली सरकारनं एक कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अरविंद केजरीवाल बोलत होते. 'रक्षाबंधनाच्या निमित्तावर मी माझ्या बहिणींना एक भेट देऊ इच्छितो. सर्व महिला २९ ऑक्टोबरपासून दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि क्लस्टर बसमधून मोफत प्रवास करू शकतील' अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. 

आम आदमी पक्षाच्या सरकारसाठी महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दिल्ली सरकारनं दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि महिलांसाठी मोफत सार्वजनिक परिवहन सुविधा प्रदान करणं यांचा समावेश आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. 

दिल्ली सरकारला बसमध्ये महिलांना मोफत प्रवास प्रदान करण्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता नाही कारण दिल्ली सरकार यासाठी सबसिडी देणार आहे, असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.

ज्या महिला तिकीट विकत घेण्यासाठी सक्षम आहेत त्या तिकीट घेऊन प्रवास करू शकतात, असंही केजरीवाल यांनी म्हटलंय. जून महिन्यात त्यांनी सुरक्षेसाठी महिलांना सार्वजनिक वाहनांचा उपयोग करण्याचा आग्रह केला होता. यालाच प्रोत्साहन देण्यासाठी केजरीवाल यांनी दिल्ली मेट्रोमध्येही महिलांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याच्या आपल्या योजनेचा खुलासा केला होता. परंतु, केंद्रानं मात्र महिलांना मोफत मेट्रो प्रवास उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिला.