Apple iPhone : आयफोन हे अनेकांसाठीच स्टेटस सिंबॉल असताना अनेकांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरत आहे. काहींसाठी हाच आयफोन नोकरीची संधी मिळवून देणारा एक स्त्रोत ठरणार आहे. भारतातील होतकरू आणि नव्या जोमाच्या तरुणाईला थेट अॅपलमुळं नोकरीच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळं नोकरीच्या क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी ठरत आहे.
Apple च्या आयफोनची निर्मिती लवकरच भारतात केली जाणार आहे. त्याच धर्तीवर कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी माहिती देत एप्रिल 2024 पासून अॅपलकडून देवनहल्लीत आयफोन तयार करण्यास सुरुवात होईल असं ते म्हणाले. सदरील प्रक्रिया अधिक सुविधाजनक करण्यासाठी राज्यशासनाकडून 1 जुलैपासून कंपनीला या प्लांटसाठीची जमीन सुपूर्द करण्यात येणार आहे.
भारतामध्ये दृष्टीक्षेपात असणाऱ्या या योजनेची साधारण किंमत 13600 कोटी रुपये इतकी आहे. ज्यामुळं तब्बल 50 हजार ते 1 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. Foxconn शी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्लांटमध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तमोत्तम नफा मिळण्याची हमी कंपनीकडून देण्यात आली आहे.
Foxconn कडून भारतात तयार केल्या जाणाऱ्या आयफोनच्या निर्मिती प्रक्रियेसाठी विविध विभाग सुसूत्रतेनं एकाच वेळी काम करणार आहेत. त्यामुळं या विभागांमध्ये काम करण्याची संधी देशातील मोठ्या वर्गाला मिळणार आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला हा देशातील बहुप्रतिक्षित आणि एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरत आहे.
Foxconn च्या या प्रकल्पाअंतर्गत सुरु होणारा हा प्लांट तीन टप्प्यांमध्ये कार्यपद्धतीची सुरुवात करेल. शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून किमान 20 मिलियन आयफोन युनिट तयार केले जाण्याचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे.
सरासरी आकडेवारी पाहायची झाल्यास अॅपलकडून वर्षाला 220 आफोनची विक्री होते. 2021 मध्ये अॅपसनं 233 आयफोन विकले होते. परिणामी प्राथमिक अंदाज पाहता बंगळुरूमध्ये आलेल्या Foxconn च्या कारखान्यामुळं इथून पर्यायी भारतातून एकूण उत्पादनाच्या 7 ते 10 टक्के आयफोन युनिट तयार केले जातील.