हार्दिक पटेलला धक्का, माजी सहकारी भाजपच्या वाटेवर

पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा माजी सहकारी चिराग पटेलने भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात समावेश केला.

Updated: Nov 17, 2017, 07:57 AM IST
हार्दिक पटेलला धक्का, माजी सहकारी भाजपच्या वाटेवर title=

अहमदाबाद : पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा माजी सहकारी चिराग पटेलने भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात समावेश केला.

हा हार्दिक पटेलसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हार्दिक पटेलसोबतच चिराग पटेल यांनाही राजद्रोहाच्या आरोपाचा सामना करावा लागत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर चिराग यांनी खाजगी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाटीदार आरक्षण आंदोलनावर हार्दिकने कब्जा केल्याचा आरोप केलाय. 

ते म्हणाले की, ‘पाटीदार समुदायाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता एका व्यक्तीच्या खाजगी महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं माध्यम बनलं आहे. हे आंदोलन धन आणि सत्ता मिळवण्याचं एक माध्यम झालं आहे. मला वाटतं आंदोलन चुकीच्या दिशेने जाणार आहे’.

याआधी भाजपने पाटीदार समाजाचे दोन नेता रेशमा पटेल आणि वरूण पटेल यांनाही पक्षात खेचले. भाजपमध्ये सहभागी झाल्यावर रेशमा पटेल म्हणाल्या की, आमची लढाई समाजाला न्याय मिळवून देण्याची होती, कॉंग्रेसला जिंकवण्याची नाही. भाजपने आमच्या तीन मागण्या पूर्ण केल्या आहेत’. 

पाटीदार अनामत आंदोलन समितीने आरोप केलाय की, हार्दिक पटेलच्या कथित सेक्स क्लिपसाठी गुजरातचे मुख्यमंत्री अणि प्रदेश भाजप अध्यक्ष जबाबदार आहेत. पण सत्ताधा-यांनी हा आरोप फेटाळून लावलाय.