रांची : चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह १५ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. सकाळी लालू प्रसाद यादव व इतर दोषी रांचीच्या सीबीआय विशेष कोर्टात हजर झाले होते. मात्र, वकील विंदेश्वरी प्रसाद यांचं निधन झाल्याने या शिक्षेवरील सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आलीय.
तुरुंगात आपल्याला थंडी वाजत असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयाकडं केली. त्यावर तबला किंवा हार्मोनिअम शिकण्याचा सल्ला न्यायाधीशांनी लालूंना दिला. आपलं मन कशात तरी गुंतवून ठेवण्याचा सल्ला देत लालूंच्या थंडीचा मुद्दा न्यायालयानं निकाली काढला.
देवघर तिजोरीमधून ९० लाख रुपये काढल्याप्रकरणी लालूंसह १५ जणांना रांचीतील विशेष सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलं होतं. कालपासून शिक्षेवरच्या युक्तीवादाला सुरुवात झालीय.
दुसरीकडे न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावलीय. कोर्टाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलीय.
लालू प्रसाद यादव सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात आहेत. लालू यादव यांना कोर्टात काय शिक्षा सुनावली जाणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
सीबीआयच्या विशेष कोर्टाने २३ डिसेंबर २०१७ रोजी लालूप्रसाद यादव, माजी खासदार आर. के. राणा आणि जगदीश शर्मा यांच्यासह १५ जणांना दोषी ठरवलंय.