इंदोर : ग्रहणाबद्दल आपल्याकडे खूप सारे गैरसमज पसरवले जात असतात. त्यामुळे अनेकांच्या मनात ग्रहणाबद्दल वर्षानुवर्षे भिती पाहायला मिळते. पण खगोलप्रेमींसाठी हा आनंदाचा दिवस असतो. वैज्ञानिकदृष्ट्या या दिवसाला फार महत्त्व असते. खगोलप्रेमी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. 2018 मध्ये एकूण पाच सुर्य आणि चंद्र ग्रहण पाहायला मिळाले. यामध्ये दोन पूर्ण चंद्रग्रहण आणि 3 अंशिक सुर्यग्रहण पाहायला मिळाले. 2019 हे नवे वर्ष 3 सुर्य ग्रहण आणि 2 चंद्र ग्रहण रोमांचक खगोलीय घटनांचे साक्षीदार बनणार आहे. भारतामध्ये यातील 2 ग्रहणच दिसणार आहेत. उजैनच्या शासकीय वेधशाळेचे अधिक्षक डॉ. राजेंद्रप्रकाश गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली. आगामी वर्षात ग्रहणांचे हे सत्र 6 जानेवारीपासून पाहायला मिळेल. या दिवशी अंशिक सुर्यग्रहण असेल पण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
2019 मध्ये 21 जानेवारीला पूर्ण चंद्रग्रहण लागणार असल्याचे कालगणनेचा हवाला देत गुप्ता यांनी सांगितले. सुर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येण्याचा हा योग असणार आहे. त्यावेळेस इथे दिवस असेल आणि प्रकाशामुळे या योगही भारतीयांना दिसणार नाही.
2 आणि 3 जुलै दरम्यान रात्री पूर्ण सुर्यग्रहण असणार आहे. भारतामध्ये तेव्हा रात्रीची वेळ असल्याने हे ग्रहण देखील भारतीयांना पाहायला मिळणार नाही. असे असले तरीही भारतीय खगोलप्रेमी 16 आणि 17 जुलै दरम्यान रात्रीचे अंशिक चंद्रग्रहण पाहू शकणार आहेत.
26 डिसेंबर 2019 ला वलयाकार सुर्यग्रहणाचा नजारा पाहायला मिळणार आहे. भारतीय खगोलप्रमींना हे दृश्य अनुभवता येणार आहे. दक्षिण भाग म्हणजेच कन्नूर, कोझीकोड, मदुराई आणि त्रिशूर या भागाला संपूर्ण ग्रहण पाहता येणार आहे.