Covid19वर मात केलेल्या रुग्णाची प्रतिक्रिया; उपचाराविषयी दिली माहिती

आपल्या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला.... 

Updated: Mar 16, 2020, 11:42 AM IST
Covid19वर मात केलेल्या रुग्णाची प्रतिक्रिया; उपचाराविषयी दिली माहिती  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : Corona कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण ठणठणीत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्त केलं. हे ऐकताच त्या ४५ वर्षीय रुग्णाने लगेचच त्याचं सामान एकत्र करत साडेसहा वाजता तो पूर्व दिल्लीस्थित त्याच्या घरीही पोहोचला. 

मिलान, बुडापेस्ट आणि व्हिएन्ना अशा ठिकाणी जाऊन आलेल्या या व्यक्तीला आणि त्याच्या दोन नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली होती. जेसुद्धा त्याच्यासोबत या प्रवासाच सहभागी झाले होते. कामानिमित्ताने इटलीला त्यांचं जाणं झालं होतं. 
शनिवारी या व्यक्तीने जवळपास १४ दिवसांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी तो कारमधून बाहेर येताच त्याच्या ६५ वर्षीय आईचे अश्रू अनावर झाले. याचविषयी सांगताना माझ्यासाठी तो अतिशय भावनिक क्षण होता, सर्वजण माझीच वाट पाहात होते, असं तो 'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना म्हणाला. 

रुग्णालयातून सुखरुप बाहेर आलेल्या या व्यक्तीने सर्वप्रथम एक अतिशय महत्त्वाचं काम हाती घेतलं आहे. ज्यामध्ये त्याने कोरोनाविषयीचे उपचार, प्रतिबंधात्मक उपाय याविषयी स्वानुभवातून काही गोष्टी सर्वांपुढे आणल्या आहेत. शिवाय भारतामध्ये कोरोनाग्रस्तांना कशा प्रकारे उत्तमोत्तम उपचार देऊन त्यांची निगा राखली जात आहे, हेसुद्धा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचाच त्याचा प्रयत्न आहे. 

वाचा : Corona मास्क बनवण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल; कैद्यांना लावलं कामाला

'अनेकांमध्ये विलगीकरण या एका शब्दानेच भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. पण, हे कक्ष म्हणजे रुग्णांसाठीचा एक सुसज्ज बेडरुमच आहे. जिथे स्वच्छतेची प्रचंड काळजी घेतली जाते. शिवाय वैद्यकिय मदतीनेच या व्हायरसशी लढता येऊ शकतं', असं तो म्हणाला. होळीच्या वेळीसुद्धा तो रुग्णालयातच होता. पण, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या एका फोनने त्याला भलताच आनंद दिला. 

आपल्या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, 'आरोग्यमंत्र्यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मला फोन केला होता. मला ते एक डॉक्टर म्हणून ठाऊक होते. पण, व्यक्तीगत पातळीवर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल असं मला केव्हाच वाटलं नव्हतं'. आपण सुरक्षित हातांमध्ये असल्याची भावना त्याने व्यक्त करत ज्या देशाने पोलिओसारख्या आजाराला हरवलं तो कोरोनावरही मात करेल असा विश्वास त्याने व्यक्त केला.