'निर्मला सीतारामन अर्थमंत्रीपदासाठी सक्षम नाहीत'

अर्थमंत्री उद्दामपणे मी कांदा आणि लसूण खात नाही, असे उत्तर देतात.

Updated: Dec 5, 2019, 11:06 PM IST
'निर्मला सीतारामन अर्थमंत्रीपदासाठी सक्षम नाहीत' title=

नवी दिल्ली: निर्मला सीतारामन या अर्थमंत्री या पदासाठी सक्षम नाहीत. त्यामुळेच सीतारामन यांना सध्या सभोवताली काय सुरु आहे, हे कळेनासे झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. याउलट संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) अर्थमंत्रीपदी नेहमी सक्षम व्यक्तींच्या नियुक्तीला प्राधान्य दिले, असे राहुल गांधी यांनी म्हटले.  

देशातील कांद्याच्या वाढलेल्या दरासंदर्भात बुधवारी लोकसभेत चर्चा सुरु असताना निर्मला सीतारामन यांनी वादग्रस्त विधान केले होते. माझ्या घरात कांदा-लसूण फार प्रमाणात वापरत नाहीत. त्यामुळे माझा कांद्याशी फार संबंध नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले होते. विरोधकांनी संसदेबाहेरही हा मुद्दा लावून धरला. यानंतर सोशल मीडियावर निर्मला सीतारामन यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आगपाखड झाली होती. 

हाच धागा पकडत राहुल गांधी यांनी गुरुवारी निर्मला सीतारामन यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते गुरुवारी केरळमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही काय खाता याबद्दल देशाला सांगणे, हे अर्थमंत्र्यांचे काम नसते. देशाच्या अर्थमंत्र्यांना कांदयाच्या वाढलेल्या दरांविषयी विचारले जाते. त्यावर अर्थमंत्री उद्दामपणे मी कांदा आणि लसूण खात नाही, असे उत्तर देतात. मुळात निर्मला सीतारामन यांना आपल्या सभोवताली काय सुरू आहे, हेच कळेनासे झाले आहे. कारण, अर्थमंत्रीपदासाठी त्या अकार्यक्षम आहेत. यूपीएच्या काळात अर्थव्यवस्थेची सूत्रे कायम सक्षम लोकांकडेच होती. यूपीए सरकारने १०-१५ वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेची उत्तम बांधणी केली. हे भारताचे बलस्थान होते. मात्र, आताच्या सरकारने तेच उद्ध्वस्त केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.