कोरोनाशी केलेत दोनहात, भारतातील केरळ राज्याचा जगात बोलबाला

भारतासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना केरळमध्ये मात्र हा आलेख खाली जात आहे.  

Updated: Apr 16, 2020, 12:43 PM IST
कोरोनाशी केलेत दोनहात, भारतातील केरळ राज्याचा जगात बोलबाला title=

मुंबई : कोरोनाला कसं हरवायचं, याच्या चिंतेत अख्खं जग असताना भारतातल्या एका राज्यानं सगळ्या जगासमोर एक चांगलं उदाहरण निर्माण केले आहे. अमेरिकेच्या 'द वॉशिंग्टन पोस्ट'नेही त्याबद्दल या राज्याचं कौतुक केले आहे. देशातील कुठले आहे हे राज्य आणि कसा सुरु आहे या राज्यात कोरोनाशी मुकाबला.

भारतासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना केरळमध्ये मात्र हा आलेख खाली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासाठी केरळचे कौतुक केलं जात आहे. कसं शक्य झालं केरळला कोरोनावर मात करणं. जानेवारीच्या उत्तरार्धात केरळमध्ये कोरोनाबाधित पहिलं कुटुंब सापडताच प्रशासनाची चक्रं वेगानं फिरली. केरळमध्ये चार आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर उतरणाऱ्या सगळ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. केरळनं मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगला प्राधान्य दिले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांचं ट्रेसिंग पण ते अत्यंत वेगानं सुरू केलं 
त्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या मोबाईलमधल्या जीपीएसचाही वापर केला. लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जागेची व्यवस्था वेगानं केली. क्वारंटाईन आणि आयसोलेशनमध्ये असलेल्यांसाठी कॉलसेंटर्स स्थापन केली.

आयसोलेशनमध्ये असलेल्या प्रत्येकाला रोज फोन जायचा, त्यांना कुठली लक्षणं आहेत का, एवढंच नव्हे तर त्यांची मानसिक स्थिती चांगली आहे ना, याचीही चौकशी केली जायची. महत्त्वाचं म्हणजे कुणी काही लपवत आहे का, असा संशय येताच त्याला पोलीस तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यायचे.

केरळनं रुग्णांची काळजी घेतली. त्याचबरोबर स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठीही विशेष व्यवस्था केली. लॉकडाऊनची चिन्हं ओळखून गरीब आणि अडचणीत सापडलेल्यांसाठी कम्युनिटी किचनची अर्थात जेवणाची व्यवस्था करणारं केरळ पहिलं राज्य ठरलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण ३० टक्क्यांनी घटले. केरळाची सध्याची स्थिती विचारात घेतली तर केरळात गेल्या २४ तासांत केवळ १ रूग्ण आढळलाय. ७ रूग्ण कोरोनामुक्त झालेत. तर आत्तापर्यंत केरळात मृत्यू केवळ दोन झालेत. 

 केरळमध्ये कोरोनाशी मुकाबला करण्यात अत्यंत सक्षम भूमिका बजावली ती केरळच्या आरोग्यमंत्री के शैलजा आणि प्रशासकीय अधिकारी पी. बी. नूह यांनी. सरकारवे ठरवलेल्या प्लॅनची अत्यंत वेगानं आणि चोख अंमलबजावणी या दोघांच्या नेतृत्वात झाली. केरळमं याआधीही 'सार्स'चाही यशस्वी मुकाबला केला होता. केरळमध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त असल्याचा फायदाही या लढाईत झाला. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केरळच्या जनतेनं कोरोनाला अत्यंत गांभीर्यानं घेतलं आणि कोरोनाची साखळी तोडायला मदत केली.