दिल्ली : भारतीय रेल्वेची पहिली सुवर्ण ट्रेन आज प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वेने प्रिमियम ट्रेन पुन्हा नव्या स्वरूपात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यापैकी सुवर्ण प्रोजेक्टमधील ही पहिली ट्रेन आहे. नवी दिल्ली ते काठगोदाम दरम्यान ही नवी ट्रेन चालवली जाणार आहे. ही सुवर्ण ट्रेन शताब्दी एक्सप्रेस कॅटेगरीमधील आहे.
कशा असतील नव्या ट्रेनमधील सोयी सुविधा ?
ट्रॉली सर्व्हिसने कॅटरिंग
रेल्वे प्रशासनाने नव्या ट्रेनमध्ये कॅटरिंग सर्व्हिसमध्ये बदल केली आहे. त्यानुसार ट्रॉली सर्व्हिस,युनिफॉर्म्ड स्टाफ आणि मनोरंजनासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. याकरिता ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक चांगल्याप्रकारे प्रवास करता यावेत याकरिता सुरेश प्रभूंनी हे बदल सुचवले होते. त्यानुसार ३० प्रिमियम ट्रेन्समध्ये बदल करण्यात आले आहेत. या प्रोजेक्टवर २५ करोड रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. याकरिता १५ राजधानी आनि १५ शताब्दी ट्रेन्सचा समावेश करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही
सुवर्ण प्रोजेक्टच्या ट्रेनमध्ये सुरक्षा व्यवस्थादेखील कडक करण्यात आली आहे. याकरिता ट्रेनमध्ये आरपीएफ जवान तैनात असतील. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. ट्रेन आतून आकर्षक बनवली जाईल. त्यानुसार शौचालयात बदल केले जाणार आहेत. तसेच कोचमधील स्वच्छतादेखील सुधारली जाणार आहे.
प्रशिक्षित स्टाफ
स्वर्ण ट्रेन प्रोजेक्टनुसार, स्टाफला स्वच्छता आणि खाणं पोहचवण्यासाठी ट्रॉलीचा वापर कसा केला जाऊ शकतो याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्टाफला खास युनिफॉर्म दिला जाणार आहे. ट्रेनमध्ये चित्रपट, सिरिअल्स,गाणी आणि मनोरंजनाची इतर काही साधनं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. प्रवासांना या ट्रेनमध्ये मोफत वायफाय हॉटस्पॉटची सोय मिळणार आहे. यामुळे लाईव्ह स्ट्रिमिंगही पाहता येणं सुकर होणार आहे.