म्हणून मेट्रोचे रोजचे ३ लाख प्रवासी कमी झाले

ऑक्टोबरमध्ये दिल्ली मेट्रोनं तिकीट दर वाढवले होते. याचा बराच मोठा फटका मेट्रोला बसला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 24, 2017, 10:38 PM IST
म्हणून मेट्रोचे रोजचे ३ लाख प्रवासी कमी झाले  title=

नवी दिल्ली : ऑक्टोबरमध्ये दिल्ली मेट्रोनं तिकीट दर वाढवले होते. याचा बराच मोठा फटका मेट्रोला बसला आहे. मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तीन लाखांनी घटली आहे. तिकीट दर वाढल्यावर ऑक्टोबरमध्ये रोजची प्रवासी संख्या २४.२ लाख एवढी होती. तर सप्टेंबरमध्ये तिकीट दरवाढीआधी हिच संख्या दिवसाला २७.४ लाख एवढी होती. तिकीट दरवाढीमुळे प्रवासी संख्या तब्बल ११ टक्क्यांनी कमी झाली आहे.

पीटीआयच्या पत्रकारानं दाखल केलेल्या आरटीआयमध्ये ही माहिती समोर आली आहे. ५० किलोमिटरची दिल्ली मेट्रो द्वारका ते नोएडापर्यंत चालते. मेट्रोकडे दिल्ली-एनसीआरमध्ये २१८ किमीचं नेटवर्क आहे. उत्तर दिल्लीमधल्या समयपूर बादली गुडगाव मेट्रो लाईनवरचे प्रवासी १९ लाखांनी कमी झाले आहेत.

याआधीही तिकीट दर वाढल्यानंतर मेट्रोच्या प्रवाशांची संख्या घटली होती. ऑक्टोबर २०१६मध्ये मेट्रोनं दरदिवशी २७.२ लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर १० ऑक्टोबरला १० रुपयांची भाडेवाढ करण्यात आली. त्याआधी ५ महिन्यांपूर्वी तिकीट दरांमध्ये १०० टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. मेमध्ये झालेल्या या भाडेवाढीनंतर जूनमध्ये प्रवाशांची संख्या दरदिवशी १.५ लाखांनी कमी झाली होती.