Fake IPL in Gujarat: आयपीएल ही जगातील सर्वात महागड्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असतं. खासकरून सट्टेबाजांसाठी एक पर्वणी असते. या काळात पोलीस अनेक सट्टेबाजांना अटक करतात. मात्र इतकी कारवाई करून सट्टा काही थांबत नाही. असं असलं तरी गुजरातमधून आयपीएल संदर्भातील धक्कादायक प्रकरण उघड झालं आहे. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये कोणती स्पर्धा सुरु आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. इतकंच नाही तर ही स्पर्धा खरीखुरी आयपीएल स्पर्धा असल्याचं भासवून मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात आला होता. त्याचबरोबर रशियन नागरिकांनाही बेटिंगच्या जाळ्यात ओढलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
कशी आयोजित केली ही बनावट आयपीएल लीग?
बनावट क्रिकेट लीग आयोजित करण्यासाठी शेत भाड्याने घेण्यात आले होते. मजुरांना सामना खेळण्यासाठी प्रति सामना 400 रुपये देण्यात आले होते. सामन्यादरम्यान मजुरांना जर्सी घालून मैदानात उतरवले जात होते आणि बनावट पंचही ठेवण्यात आले होते. सामन्यादरम्यान मागून ऑडिओ इफेक्टही देण्यात आा होता. खरीखुरी आयपीएल असल्याचं यातून भासवण्यात आलं होतं. सामन्याचे चित्रीकरण करण्यासाठी एचडी कॅमेरे लावण्यात आले होते आणि सामन्यांचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जात होते. यासाठी सेंच्युरी हीटर नावाची टीम CRICHEROES नावाच्या अॅपवर नोंदणीकृत करण्यात आली होती. इतकंच नाही तर प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या आवाजाची नक्कल करणाऱ्या व्यक्तीकडून समालोचन करून घेत होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी बातमी ट्वीट करत लिहिलं आहे की, "मी माझं हसू थांबवू शकत नाही. पण समालोचकाचं नक्की ऐका".
Can't stop laughing. Must hear this "commentator" pic.twitter.com/H4EcTBkJVa
— Harsha Bhogle (@bhogleharsha) July 11, 2022
पोलिसांनी सांगितले की, शोएब दावडा नावाच्या व्यक्तीने सट्टेबाजीसाठी संपूर्ण मैदान तयार केले होते आणि 20-20 षटकांचा सामना खेळवला जात होता. सामना खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना कसे खेळायचे, कधी आऊट व्हायचे आणि किती धावा करायचे याच्या आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. गुजरातमध्ये सुरू असलेल्या या बनावट आयपीएलद्वारे ठगांनी रशियातील ट्व्हर, वोरोनेझ आणि मॉस्को या तीन शहरांतील लोकांना आपल्या जाळ्यात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. मेहसाणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले असून आतापर्यंत घटनास्थळावरून 3 लाख रुपयांसह 4 जणांना अटक केली आहे. या बनावट लीग सामन्यातून सुरू असलेल्या सट्टेबाजीचा मेहसाणा पोलीस तपास करत असून, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेटचा हात असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.