या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, सतर्क राहण्याचे आवाहन

...

Updated: Jun 18, 2018, 03:44 PM IST
या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, सतर्क राहण्याचे आवाहन title=
File Photo

नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी मान्सून दाखल झाला आहे. मात्र, अद्यापही काही राज्यांत नागरिकांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतातील राजस्थान आणि गुजरात सारख्या राज्यांत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये तापमान २ ते ३ डिग्री सेस्लियसने घट होण्याची शक्यता आहे.

हवानान विभागाचे अधिकारी चरण सिंह यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतातील अनेक ठिकाणी एक-दोन दिवसांत वादळीवाऱ्यासह पाऊस पडू शकतो. दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या पाऊस पडणार नाही. दिल्लीत २९ जूनपर्यंत पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, उत्तर भारतातील बिहार, झारखंज आणि ओडिशा सारख्या राज्यांमधील तापमानात घट पहायला मिळू शकते.

उत्तर प्रदेशला वादळीवाऱ्याचा फटका

उत्तर प्रदेशात गेल्या आठवड्यात आलेल्या वादळीवाऱ्यामुळे खूप नुकसान झालं होतं. यामुळे जवळपास २४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तर, १२० हून अधिक जखमी झाले आहेत. आठ जून रोजी झालेल्या वादळीवाऱ्यामुळे जौनपूर आणि सुल्तानपूरमध्ये ५, उन्नावमध्ये ४, चंदोलीत ३ तर बहराइचमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा सारख्या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आङे. आसाममध्ये या वर्षात आलेल्या पूरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १२वर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्बी आंगलोंग पश्चिम, गोलाघाट, करीमगंज, हैलाकांडी आणि कछार जिल्ह्यांमध्ये ४.४८ लाखांहून अधिक नागरिकांना महापूर आणि वादळीवाऱ्याचा फटका बसला आहे.