तिरुअनंतपुरम : केरळच्या मंदिरांत पहिल्यांदाच दलित तरुण पुजारी बनण्याची शक्यता निर्माण झालीय.
केरळ देवास्वोम भर्ती बोर्डानं अनुसुचित जातीच्या सहा जणांसहीत ३६ गैर ब्राम्हणांना पुजारी म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केलीय. या मंदिराची जबाबदारी त्रावणकोर देवास्वोम बोर्डावर आहे.
भर्ती बोर्डाच्या म्हणण्यानुसार, लोक सेवा आयोग (पीएससी)च्या धर्तीवर घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेत आणि मुलाखतीनंतर या तरुणांची पुजारी म्हणून निवड करण्यात आलीय.
भ्रष्टाचारासाठी कोणतीही जागा नको, असं देवास्वोमचे मंत्री के. रामचंद्रन यांनी म्हटलंय. एकूण ६२ पुजाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलीय. यातील २६ पदांवर इतर जातीच्या पुजाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.
'टीडीबी'कडे सबरीमालाचे प्रसिद्ध भगवान अय्यप्पा मंदिरासोबतच १२४८ मंदिरांची जबाबदारी आहे. हे बोर्ड त्रावणकोर - कोचीन हिंदू धार्मिक संघटना अधिनियम १९५० नुसार काम करतं.