भाजपच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी घटवला; ममता बॅनर्जींचा आरोप

कोलकात्यामधील हिंसाचार बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या हिंसाचाराइतकाच भीषण होता. 

Updated: May 15, 2019, 09:58 PM IST
भाजपच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी घटवला; ममता बॅनर्जींचा आरोप title=

कोलकाता: निवडणूक आयोगाने भाजपच्या सांगण्यावरूनच पश्चिम बंगालमधील प्रचाराचा कालावधी कमी केला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय अयोग्य, अनैतिक आणि राजकीयदृष्ट्या पक्षपाती आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी होणाऱ्या दोन सभा घेण्यासाठी वेळ देऊ केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने प्रचार थांबवण्याचे आदेश दिल्याचे ममता यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. 

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील ९ मतदारसंघांमधील निवडणूक प्रचाराचा कालावाधी २० तासांनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून येथील प्रचार बंद होईल. 

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही लक्ष्य केले. अमित शहा यांनी बाहेरून गुंड आणून कोलकात्यामध्ये हिंसाचार घडवला. हा हिंसाचार बाबरी मशिदीच्या पतनानंतर झालेल्या हिंसाचाराइतकाच भीषण होता. या हिंसाचारावेळी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीचीही तोडफोड करण्यात आली. मात्र, नरेंद्र मोदींना त्याबद्दल काहीही वाटत नाही. बंगालच्या जनतेने ही गोष्ट गंभीरपणे घेतली आहे. आम्ही अमित शहा यांच्याविरुद्ध जरुर कारवाई करू. 

अमित शहांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धमकावले. त्यामुळेच प्रचाराचा कालावधी घटवण्याचा निर्णय घेण्यात आला का? निवडणूक आयोग सध्या भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या हिंसाचारासाठी अमित शहा कारणीभूत आहेत. मग तरीही निवडणूक आयोग त्यांच्याकडे स्पष्टीकरण का मागत नाही? मी नरेंद्र मोदींविरोधात बोलते म्हणूनच पश्चिम बंगालला लक्ष्य केले जात असल्याचे ममतांनी सांगितले.