लाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...

'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय. 

Updated: Jan 24, 2018, 03:45 PM IST
लाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...  title=

नवी दिल्ली : 'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध आमदारांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टानं गुरुवारी निवडणूक आयोगाला पुढच्या सोमवारी प्रकरणाच्या सुनावणीपर्यंत फेरनिवडणुका संदर्भात कोणत्याही लगेचच सूचना जारी न करण्याचे निर्देश दिलेत.

सोबतच दिल्ली उच्च न्यायालयानं या संदर्भात आमदारांसोबतच निवडणूक आयोगाकडेही स्पष्टीकरण मागितलंय.  

आपच्या काही आमदारांनी 'लाभदायक पदां'च्या आधारावर अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलंय. आपच्या आमदारांनी न्यायमूर्ती एस रविंद्र भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित खंडपीठासमोर हा मुद्दा मांडला. 

यापूर्वी, आपच्या आमदारांनी लाभाच्या पदांचं अधिग्रहण केल्याचं सांगत निवडणूक आयोगानं २० आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. ही मागणी राष्ट्रपतींनी मंजूर केली होती.