मोदींसाठी नव्हे तर या कारणासाठी पत्रकार परिषदेची वेळ बदलली- निवडणूक आयोग

नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते.

Updated: Oct 6, 2018, 08:13 PM IST
मोदींसाठी नव्हे तर या कारणासाठी पत्रकार परिषदेची वेळ बदलली- निवडणूक आयोग title=

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाकडून शनिवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यासाठी घेण्यात आलेली ही पत्रकार परिषद वादग्रस्त ठरली. नियोजित वेळेनुसार ही पत्रकार परिषद दुपारी वाजता होणार होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजमेर येथील जाहीर सभेमुळे या पत्रकार परिषदेची वेळ बदलण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला. 

मात्र, निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेची वेळ बदलण्याची कारण प्रसारमाध्यमांना सांगितले. नेत्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते. यावर आम्ही कुठलेही भाष्य करणार नाही, असे रावत यांनी म्हटले. 

तेलंगण रोल्सच्या प्रकाशनासाठी अखेरच्या क्षणी टाइमलाइन निश्चित करण्यात आली. मात्र, यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी मिळणे आवश्यक होते. तसेच एका राज्याने पोटनिवडणुका उशीरा घेण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात वेळ गेल्यामुळे ही पत्रकार परिषद दुपारी तीन वाजता घेण्यात आल्याचे रावत यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अजमेर येथे दुपारी एक वाजता जाहीर सभा होती. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होते. त्यामुळे ही सभा रद्द करावी लागली असती. परिणामी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद तीन वाजता घेण्यात आली, असा आरोप विरोधकांनी केला. हा प्रकार खूपच दुर्दैवी असल्याची टीका यशवंत सिन्हा यांनी केली.