'चौकीदार चोर है' जाहिरात आणि व्हिडीओवर निवडणूक आयोगाची बंदी

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे 'चौकीदार चोर है' जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे. 

Updated: Apr 18, 2019, 02:30 PM IST
'चौकीदार चोर है' जाहिरात आणि व्हिडीओवर निवडणूक आयोगाची बंदी  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 ची जोरदार तयारी सर्व पक्ष करत आहेत. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. प्रत्येक मतदार संघात  जसंजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसे राजकीय पक्ष अधिक आक्रमक होताना दिसत आहे. भाजपाने मतदारांना प्रभावित करण्यासाठी मै भी चौकीदार गाणे आणले. यामध्ये भाजपाची निती दाखवण्यात आली. त्यानंतर याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने 'चौकीदार चोर हे' हे कॅम्पेनिंग करण्यास सुरूवात केली. पण आता निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे 'चौकीदार चोर है' जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचार अभियानाला जोरदार झटका लागला आहे. 

'चौकीदार चोर है' या जाहीरात आणि व्हिडीओवर बंदी आणण्याचे निर्देश  मुख्य निर्वाचन पदाधिकारी कार्यालयाने भोपाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काँग्रेसच्या प्रचार अभियानाला हा जोरदार झटका मानला जात आहे. भाजपाने निवडणूक आयोगाकडे या जाहीराती संदर्भात तक्रार केली होती. काँग्रेसची जाहीरात 'चौकीदार चोर है' वर बंदी घालावी असे राज्य स्तरीय मीडिया प्रमाणन म्हणजेच अनुरीक्षण समितीने म्हटले आहे. 

चौकीदार चोर है हे कॅम्पेन काँग्रेसतर्फे चालवण्यात येत आहे. पण या विधानामुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 'चौकीदार चोर है' या विधानाचे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्याकडे मागितले आहे. भाजपा खासदार मीनाक्षी लेखींच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. राफेल करारात अंबानींच्या कंपनीसोबत करार करण्यात पंतप्रधानांचा पुढाकार होता. हे सर्व नियमबाह्य आणि हेतुपूर्वक पद्धतीने केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. सध्या राहुल गांधींकडे उत्तर देण्यासाठी 22 एप्रिल पर्यंतचा वेळ आहे.