नवी दिल्ली : दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं सर्वत्र दहन केलं जातं. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधानांनी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केलं.
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारीदेखील उपस्थित होते. दिल्लीतील सुभाष मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत इतर नेत्यांनी परंपरेनुसार पूजा केली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं की, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, विजया दशमी म्हणजे सत्याच्या विजयाचं प्रतिक आहे.
पंतप्रधान मोदींनीही संबोधित करताना सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या देशात उत्सव म्हणजे एक प्रकारचं सामाजिक शिक्षण आहे. आपले सण-उत्सव हे शेती, नदी-पर्वत आणि इतिहासासोबत जोडलेले आहेत. प्रभु राम आणि कृष्ण यांच्या कथा आजही सामाजिक जीवनात प्रेरणा देतात.