अलिशान घरं, कार आणि करोडो रुपये... दोन सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी सापडलं घबाड

सरकारी पगारापेक्षा दोनशे टक्के अधिक संपत्ती या कर्मचाऱ्यांकडे आढळली आहे

Updated: Aug 3, 2022, 08:40 PM IST
अलिशान घरं, कार आणि करोडो रुपये... दोन सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी सापडलं घबाड title=

Crime News : वैद्यकीय शिक्षण विभागात उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यात करोडो संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पगारापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यावर आहे.

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधल्या बैरगाढ भागात राहणाऱ्या हिरो केसवानी या कर्मचाऱ्याच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. 

हिरो केसवानी याच्या घरातून मालमत्तेची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय सोनं-चांदीचे दागिने सापडले आहेत. . गेल्या अनेक दिवसांपासून सातपुडा भवनमध्ये नियुक्त वरिष्ठ लिपिकाच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे येत होत्या.

असिस्टंट इंजिनिअरच्या घरावरही छापा
दुसरीकडे जबलपूरमध्येही आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली असून बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी जबलपूर महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याच्या घरावर छापा टाकला. सहायक अभियंता आदित्य शुक्ला याच्या घरी मिळकतीच्या 200 पट अधिक मालमत्ता आढळून आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आदित्य शुक्ला याच्याकडे लाखो रुपये रोख, जमिनीची कागदपत्रे, दोन आलिशान घरं, तीन कार सापडल्या आहेत. जबलपूर महानगरपालिकेत नियुक्त सहायक अभियंता आदित्य शुक्ला याच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता वाढवल्याबद्दल तक्रार आल्या होत्या. तक्रारींची पडताळणी केल्यानंतर आदित्या शुक्लाच्या घरावर छापा टाकण्यात आला.