लडाखनंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही जाणवले भूंकपाचे धक्के

लडाखनंतर आजुबाजुच्या राज्यातही भूंकपाचे धक्के

Updated: Jul 2, 2020, 03:00 PM IST
लडाखनंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही जाणवले भूंकपाचे धक्के title=

लडाख : लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. ४.५ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. कारगिल येथे दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याचे केंद्र कारगिलच्या वायव्येस ११ किलोमीटर अंतरावर आहे.

लडाखमध्ये भूकंपाच्या तीव्र धक्का जाणवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी अडीच वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

याआधी १ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमध्ये एकाच दिवसात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचे केंद्रबिंदू किश्तवाड्यात होते. मंगळवारी रात्री उशिरा ११.३२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. डोडा जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी होती.

भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लोक रात्री उशिरा घराबाहेर पडले. मात्र, या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. त्याच दिवशी सकाळी ८.४५ वाजता देखील भूकंपाचा धक्का जाणवला होता.

२६ जून रोजी हरियाणा आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. २६ जून रोजी हरियाणाच्या रोहतक आणि आसपासच्या भागात २.८ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर रात्री ८.१५ वाजता लडाखमध्ये देखील भूंकपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचे केंद्र लडाखमध्ये २५ किमी जमिनी खाली होते. लडाखमध्ये भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती.