दृष्यम स्टाईलने हत्या, घरातच पुरला मृतदेह... पण हे सिनेमातले पोलीस नव्हते, असा लावला शोध

दृष्यम सिनेमात दाखवल्याप्रमाणे त्याने गुन्हा केला, त्याला वाटलं सिनेमाप्रमाणेच हा गुन्हाही लपला जाईल पण... 

Updated: Oct 1, 2022, 07:51 PM IST
दृष्यम स्टाईलने हत्या, घरातच पुरला मृतदेह... पण हे सिनेमातले पोलीस नव्हते, असा लावला शोध

Crime News : दृष्यम सिनेमात (Drishyam Movie) दाखलेल्याप्रमाणे हत्या करुन घरातच मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका भाजप कार्यकर्त्याचा (BJP Workers) मृतदेह त्याच्याच एका साथीदाराच्या घरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु केला आहे. केरळातल्या कोट्टयममधली (Kottayam Kerala) ही घटना आहे. 

अजय देवगनची (Ajay Devgan) प्रमुख भूमिका असलेल्या दृष्यम या सिनेमातील त्या एका दृष्याने सिनेमा हिट झाला होता. एका मुलाची हत्या करुन घरातील अंगणात मृतदेह पूरण्याचं हे दृष्य आहे. अशीच काहीशी घटना केरळात घडली आहे. केरळामधील एका घरात जमिनीखाली बेपत्ता भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला. 

26 सप्टेंबरपासून होता बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार 43 वर्षांचा भाजप कार्यकर्ता बिंदु कुमार (Bindu Kumar) 26 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. 28 सप्टेंबरला त्याच्या कुटुंबियांना पोलिसात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना बिंदु कुमारच्या मोबाईलचं लोकेशन चंगनसेरीमधल्या एसी कॉलनीतल्या एक टॉवरजवळ दिसलं. तपास करत पोलीस एसी कॉलनीमध्ये बिंदु कुमार याचा साथीदार मुथुकुमार याच्या घरी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी त्याच्या घराच्या आवारात बिंदु कुमारची दुचाकी दिसली.

संशयावरुन पोलिसांनी केलं खोदकाम
बिंदु कुमारची दुचाकी दिसल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी मुथुकुमारकडे चौकशी सुरु केली. पण मुथुकुमार याने पोलिसांच्या प्रश्नांना उलट सुलट उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांना कोणताच सुगावा लागत नव्हता. पण पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याच्या घराचा तपास केला. घरातील एक लादी नुकतीच तिथे लावण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याठिकाणी खोदकाम सुरु केलं. तब्बल सहा तास खोदकाम केल्यानंतर पोलिसांना बिंदु कुमारचा मृतदेह हाती लागला.

पोलिासांनी बिंदु कुमारचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला असून घरातील इतर सदस्यांची चौकशी करण्यात येत आहे.