बक्षिस जाहीर केलेल्या गॅंगस्टरचा खात्मा, तिघांचा एन्काउंटर तर ६ पोलीस जखमी

बक्षिस जाहीर केलेल्या गँगस्टरचे पोलिसांनी एन्काउंटर करत केले. यात तीन जणांचा पोलिसांनी खात्मा केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 9, 2018, 05:04 PM IST
बक्षिस जाहीर केलेल्या गॅंगस्टरचा खात्मा, तिघांचा एन्काउंटर तर ६ पोलीस जखमी title=

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत आज एका गॅंगचा पोलिसांनी खात्मा केला. बक्षीस जाहीर केलेल्या गँगस्टरचे पोलिसांनी एन्काउंटर केले. पोलीस आणि भारती गँगमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यात दिल्ली पोलिसांना तीन गँगस्टरला ठार करण्यात यश आले तर एक जण जखमी झाला आहे. पोलीस आणि गँगस्टरच्या चकमकीत सहा पोलीसजखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागामध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि भारती गँगमध्ये चकमक उडाली. छतरपूर येथे राजेश भारती आपल्या गँगसोबत येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. पोलिसांनी त्यानंतर सापळा रचला. पोलिसांना पाहताच भारती गँगच्या लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यात मोस्ट वाँटेड राजेश भारती आणि त्याच्या गँगमधील पाच जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्या. यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला.

गँगस्टर राजेश भारती कोण आहे ?

राजेश भारती हा गँगस्टर हरियाणाच्या जींद येथील रहिवासी आहे. त्याच्यावर दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये कलम ३०२ आणि ३०७ अन्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दिल्लीमध्ये गुन्हा केल्यानंतर तो हरियाणामध्ये लपून बसत होता. त्याच्यावर १ लाखाचे बक्षीस लावण्यात आले होते.