नवी दिल्ली : भारत (India) सरकार चीनकडून (China) होणाऱ्या आयातीवर लगाम लावण्याच्या तयारीत आहे. त्याचदृष्टीने सरकारने पावलं उचलण्याची तयारी सुरु केली आहे. आता देशात चीनमधून आयात होणाऱ्या LED उत्पादनांची तपासणी करण्यात येणार आहे.
वाणिज्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय मानक ब्युरोने (BIS) देशातील प्रमुख कांडला, पारादीप, कोची, मुंबईसारख्या बंदरांवर आयात होणाऱ्या LED प्रोडक्टच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने (DGFT) एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.
- आयात होणाऱ्या मालामधून कोणतंही सँपल अनियमित पद्धतीने निवडलं जाईल.
- हे नमुने तपासणीसाठी भारतीय मानक ब्युरोच्या लँब्समध्ये पाठवले जातील. 7 दिवसांत तपासणी पूर्ण होईल.
- हे एलईडी प्रोडक्ट सुरक्षेच्या मापदंडाचे निकष पूर्ण करतात का, याबाबत चौकशी केली जाईल.
- केवळ हे निकष पूर्ण करण्याऱ्या, नमुन्यांच्या मालालाच कस्टमकडून मंजुरी दिली जाईल.
- निकष पूर्ण न करणारा माल पुन्हा पाठवला जाईल.
भारताने उचललेल्या या पावलामुळे चीनच्या अडचणीत वाढ होईल. चीनच्या खराब मालाला भारतात एन्ट्री न मिळाल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण चीनसाठी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची भारत ही मोठी बाजारपेठ आहे.
- आर्थिक वर्ष 2020मध्ये चीनमधून 1900 कोटी डॉलरहून अधिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात झाली.
- चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये लॅम्प्स आणि लाईट फिटिंगच्या सामानाचा समावेश आहे.
- आयात होणाऱ्या लॅम्प्स आणि लायटिंग वस्तूंची एकूण किंमत 43.6 कोटी डॉलर इतकी होती.
- किंमतीनुसार, चीनसाठी भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची एलईडी लाईटची बाजारपेठ आहे.
- लोकल उत्पादनाला चालना देण्यासाठी जुलैमध्ये भारताने चीनमधून आयात होणाऱ्या कलर टीव्हीवर बंदी घातली.
- राष्ट्रीय सुरक्षा पाहता, सरकारच्या खरेदीत चीनी कंपन्यांच्या सहभागावरही बंदी आहे.
- एप्रिलमध्ये भारताने आपल्या प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीबाबतच्या (FDI) नियमांमध्येही बदल केले.
- भारताने TikTok आणि PUBG सारख्या अनेक ऍप्स, गेम्सवरही बंदी घातली.