३० निवडणुका हरल्यानंतरही 'तो' पुन्हा उतरलाय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

१९६२ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढवली होती.

Updated: Apr 6, 2019, 10:52 AM IST
३० निवडणुका हरल्यानंतरही 'तो' पुन्हा उतरलाय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात title=

भुवनेश्वर: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने राजकीय पक्षांकडून यशापशयाचा बारकाईने विचार करून नेत्यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ओडिशामधील एक उमेदवार निवडणुकीतील विजय किंवा पराभव फारसा मनाला लावून घेताना दिसत नाही. अस्का आणि बेहरामपूर या लोकसभा मतदारसंघांतून रिंगणात उतरलेल्या श्यामभाऊ सुबुधी यांनी आतापर्यंत ३० निवडणुका लढवल्या आहेत. यापैकी एकाही निवडणुकीत विजय मिळाला नसला तरी श्यामभाऊ यांनी लढायची जिद्द हारलेली नाही. १९६२ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी ओडिशाच्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आतापर्यंत त्यांनी एकूण ३० निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, यापैकी एकाही निवडणुकीत ते विजयी झाले नाहीत. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय पक्षांकडून आपल्याला ऑफरही आल्या. मात्र, मी नेहमी अपक्ष लढण्याचाच निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर मी नरसिंह राव आणि बिजू पटनायक यांच्याविरोधातही निवडणूक लढवल्याचे श्यामभाऊ यांनी सांगितले. 

श्यामभाऊ सुबुधी यंदा अस्का आणि बेहरामपूर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी समाधानी नसल्यामुळे मी निवडणूक लढवत आहे. राजकारण्यांकडून मतासाठी लोकांना पैशाचे आमिष दाखवले जाते, अशी खंतही श्यामभाऊ यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला ११ एप्रिलपासून प्रारंभ होत असून १९ मे पर्यंत मतदानाचे सात टप्पे संपणार आहेत. यानंतर २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.