Swati Maliwal call to Delhi Police PCR: आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी धक्कादायक आरोप केल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) करण्यात आला आहे. यानुसार स्वाती मलिवाल यांच्या नावे दिल्ली पोलिसांना फोन आला होता. दिल्ली पोलिसांच्या पीसीआरवर आलेल्या या फोनमध्ये स्वाती मलिवाल यांनी आपल्याला मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण झाल्याचा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी फोन स्वाती मलिवाल यांच्याच फोनवरुन आल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल कऱण्यात आलेली नाही. किंवा कोणाचा जबाबही नोंदवण्यात आलेला नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल लाईन येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरुन एकामागोमाग एक 2 पीसीआर कॉल आले. कॉलरने आपण स्वाती मलिवाल बोलत असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केला. हे आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर करण्यात आले आहेत.
पीसीआरवर आलेल्या कॉलमध्ये सांगण्यात आलं की, विभवने मला मारहाण करायला लावली. पीसीआर कॉलनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा स्वाती मलिवाल तिथे नव्हत्या. प्रोटोकॉल असल्याने दिल्ली पोलीस मुख्यमंत्री निवासस्थानी प्रवेश करु शकत नाही. त्यामुळे सध्या पोलीस पीसीआर कॉलची सत्यता पडताळत आहेत. पण पोलिसांना अद्याप याप्रकरणी कोणतीही लिखित तक्रार मिळालेली नाही.
दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे की, स्वाती मलिवाल सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी घटनेबद्दल सांगितलं असून आम्ही पडताळणी करत आहोत. दरम्यान स्वाती मलिवाल यांनी कोणतीही लेखी तक्रार दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी भाजपानेही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत सगळा घटनाक्रम आणि आपली शंका मांडली आहे.
AAP RS MP and former DCW chief Swati Maliwal alleges that Delhi CM’s PA assaulted her. Call made from Delhi CM’s House.
Remember, Swati Maliwal had maintained radio silence on Kejriwal’s arrest. She was infact not even in India at that time and didn’t return for a long time.
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 13, 2024
"आपच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी प्रमुख स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या पीएने मारहाण केल्याचा आऱोप केला आहे. दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरुन फोन करण्यात आला. लक्षात ठेवा की, केजरीवाल यांच्या अटकेवर स्वाती मलिवाल यांनी कमालीचं मौन बाळगलं होतं. त्या खरं तर भारतातच नव्हत्या आणि फार काळ परतल्या नव्हत्या".