ती कोण होती? घरात शिरत 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली, मृतदेह बेडमध्ये लपवला आणि निघून गेली

11 वर्षांच्या एका अल्पवयी मुलीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाची आई कामावरुन परतल्यानंतर तिला मुलगा घरी दिसला नाही. शोध घेतला असता मुलाचा मृतदेह घरातल्या बेडमध्ये आढळला. सीसीटीव्हीत एक महिला घरातून बाहेर पडत असल्याचं दिसतंय. 

राजीव कासले | Updated: Aug 11, 2023, 07:44 PM IST
ती कोण होती? घरात शिरत 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली, मृतदेह बेडमध्ये लपवला आणि निघून गेली title=

Crime News : 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येने देशाची राजधानी दिल्ली (Delhi) हादरली आहे. मुलाचा मृतदेह (Boy Murder) घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट (Postmortem Report)आल्यानंतर मुलाची हत्या कशी झाली याचा उलगडा होणार आहे. पण इतक्या लहान मुलाची हत्या कोणी आणि का केली याचं गुढ कायम आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) लागलं असून यात एक महिला मृत मुलाच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. याच महिलेने मुलाची हत्या केलाचा पोलिसांना संशय आहे. 

मृत मुलाच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुलाच्या आईचं नाव निलू असं असून त्या नेहमीप्रमाणे ऑफिसमधून संध्याकाळी घरी परतल्या. पण त्यांना मुलगा दिव्यांश कुठेच दिसला नाही. त्यांनी आसपासच्या लोकांकडे मुलाबाबत विचारणा केली. पण कोणीच दिव्यांशला पाहिलं नसल्याची माहिती दिली. मुलगा डान्स क्लासला गेला असावा या शक्यतेने निलू यांनी डान्स क्लास टिचरला फोन केला. पण दिव्यांश आज क्लासला आलाच नसल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी इमारतीच्या आसपास सर्वत्र शोध घेतला. पण दिव्यांश कुठेच सापडत नव्हता. 

बराच वेळ शोध घेतल्यानंतरही सापडत नसल्याने शेवटी तीने घरात शोध घेतला. त्यावेळी बेडवरची चादर विस्कटलेली जाणवली. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. त्यांनी बेड उघडताच आतमध्ये दिव्यांशचा मृतदेह दिसला. मुलाचा मृतेदह पाहाताच निलू बेशुद्ध होऊन पडल्या. शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपास सुरु केला. तपासात पोलिसांच्या हाती इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज लागलं. 

सीसीटीव्हीमध्ये एक महिला निलू यांच्या घरातून बाहेड पडताना दिसली. ही महिला दिव्यांशच्या वडिलांच्या ओळखीची असल्याची माहिती निलू यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या महिलेचा तपाससुरु केला असून या महिलेने दिव्यांशची हत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहेत.