जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण 'त्या' एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणाच्या आत्महत्यने खळबळ

तरुण आगीत जळत असताना पोलिसांनी वाचवायचं सोडून व्हिडिओ शुटिंग केल्याचा कुटुंबियांचा आरोप. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबूक लाईव्ह करत मांडली व्यथा

Updated: Feb 27, 2023, 01:10 PM IST
जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण 'त्या' एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं,  तरुणाच्या आत्महत्यने खळबळ title=

Crime News :लहानपणापासून बॉडिबिल्डर (Bodybuilder) बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं, जिममध्ये (Gym) तासनतास घाम गाळून पिळदार शरीरयष्टी बनवली. पण शेवटी पेटवून घेत आत्महत्या (Suicide) केली. एका बॉडिबिल्डरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. तरुण वयात मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार एका लोन (Bank Loan) प्रकरणात बँक आणि पोलिसांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. 

काय आहे नेमकी घटना?
दिल्लीतल्या गोकुलपूरी परिसरातील (Delhi Gokulpuri) ही घटना आहे. इथं राहणाऱ्या 34 वर्षांच्या कपिल राज या तरुणाने 2019 मध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेतून 18 लाख 50 हजार रुपयांचं लोन घेतलं होतं. यापैकी त्याने 15 लाख रुपये चुकतेही केले. पण कपिलच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने 21 लाख रुपयांचं व्याज लावलं होतं. आणि ते भरण्यासाठी बँकेने त्याच्यामागे तगादा लावला होता.

शुक्रवारी बँकेचे कर्मचारी कोर्टाचे आदेश घेऊन गोकुलपूरी पोलिसांबरोबर कपिलचा भाऊ अशोकच्या घरी पोहोचले. कपिल आणि त्याचा मोठा भाऊ अशोक यांचं घर आजूबाजूलाच आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कपिलचं घर समजून त्याचा भाऊ अशोकच्या घरी नोटीस चिटकवली. इतकंच नाही तर पोलिसांच्या मदतीने त्यांनी अशोकचं घर सीलही केलं. 

बँक कर्मचारी आणि पोलिसांच्या त्रासाला कपिल राज कंटाळला होता. यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबूक लाईव्ह केलं. लाईव्हमध्ये त्याने आपली व्यथा मांडली. 18 लाखांपैकी 15 लाख रुपये भरल्यानंतरही बँकेने 21 लाख रुपयांचा व्याज लावलं, व्याज चुकवण्यासाठी बँकेकडून सारखा तगादा लावला जातोय, माझ्या आणि माझ्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय. यात पोलिसही बँकेच्या बाजूने असल्याचं कपिल राजने आपल्या लाईव्हमध्ये सांगितलं. त्यामुळे आपल्या आत्महत्येला एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कर्मचारी जबाबदारी असल्याचं कपिलने आरोप केला होता. 

कपिलने स्वत:वर रॉकेल टाकून आग लावून घेतली. यावेळी पोलिसांकडून त्याला वाचवण्याऐवजी व्हिडिओ शुटिंग काढत असल्याचा आरोप कपिलच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेने दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे.