वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार; पश्चिम रेल्वेकडून ७० गाड्या रद्द

चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी समुद्र प्रचंड खवळलेला आहे.

Updated: Jun 13, 2019, 09:12 AM IST
वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार; पश्चिम रेल्वेकडून ७० गाड्या रद्द title=

अहमदाबाद: वायू हे चक्रीवादळ लवकरच गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ अत्यंत गंभीर श्रेणीतील असल्याने पोरबंदर हे महुआ या किनारी परिसरात प्रशासनाकडून सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्यापूर्वीच खबरदारी म्हणून तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच गुजरातमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेय. खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनेही या भागातील तब्बल ७० एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. गुजरातच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतरही पुढील २४ तासांपर्यंत या चक्रीवादळाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, या चक्रीवादळाच्या आगमनापूर्वी समुद्र प्रचंड खवळलेला आहे. किनारी भागात तब्बल १५५ ते १६५ किलोमीटर वेगाने वारे घोंघावत आहेत. आज दुपारनंतर या वाऱ्यांचा वेग आणखीन वाढून १८० किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी आपातकालीन कक्षाला २४ तास अलर्ट राहण्याचे आदेश दिले होते. तसेच संबंधित परिसरात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) २६ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही सज्ज राहण्याचे आदेश मिळाले आहेत. याशिवाय, टेहळणी विमान आणि हेलिकॉप्टर्समधूनही सातत्याने परिस्थितीची पाहणी सुरू आहे. 

तसेच चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन किनारपट्टीवरील बंदरे आणि हवाई तळही तात्पुरत्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. केवळ अहमदाबाद विमानतळावरील हवाई सेवा सुरु राहील. या चक्रीवादळाचा फटका गुजरातसोबतच महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.