Pohawala Earning Viral Video : भारतामध्ये सर्वसामान्यपणे कॉर्परेट जॉब करणाऱ्यांचा पगार किती असतो? सरासरी 30 हजार ते 60 हजारांदरम्यान. कॉर्परेटमध्ये पगाराची रेंज अगदी 15 हजारांपासून सुरु होते. मात्र असला कॉर्परेट जॉब सोडून एखादी खाद्यपदार्थाची गाडी टाकली तर तुम्ही अधिक कमाई करु शकता असं सांगितलं तर तुमचा खरं तर विश्वास बसणार नाही. समाजातील दर्जा, कॉर्परेट नोकरी वगैरे वगैरे कारणं देत बरेच जण ही असली ऑफऱ नाकारतील. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोहेवाल्याचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा एकदा अशी ऑफर आल्यास खरोखर स्वीकारावी का असा विचार कराल. यामागील मूळ कारण म्हणजे दर महिन्याला हा पोहेवाला करत असलेली कमाई.
इंदूरमधील हा पोहेवाला दर महिन्याला त्याच्या पोह्यांच्या एका गाडीवरील पोह्यांच्या विक्रीमधून महिन्याला 75 हजारांची कमाई करतो. या पोहेवाल्याच्या मालकीच्या अशा 6 गाड्या संपूर्ण शहरांमध्ये आहेत. आप करते क्या हो नावाच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन या पोहेवाल्याची स्टोरी शेअर केली आहे. हा व्हिडीओ 1.5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 3 हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओ मिळाले आहेत.
व्हिडीओ शूट करणारा फूड ब्लॉगर या पोहेवाल्याला तुम्ही रोज किती पोहे विकता? समोरची व्यक्ती 6 ते 7 हजार प्लेट असं उत्तर देतो. एक प्लेट पोह्याची किंमत 30 ते 40 रुपये आहे. महिन्याची कमाई विचारल्यावर पोहे विक्री करणारा 60 ते 70 हजार रुपये प्रति महिन्यापर्यंत कमवतो असं सांगतो. पुढे बोलताना हा पोहेवाला शहरामध्ये माझ्या अशा 6 गाड्या आहेत असं या ब्लॉगरला सांगतो. हा पोहेवाला रोज अडीच हजार रुपये कमाई करतो. म्हणजेच त्याची महिन्याची कमाई 75 हजार आहे. 6 दुकानांचा महिन्याभराचा हिशोब लावल्यास 4.5 लाख रुपयांची कमाई हा पोहेवाला करतो. म्हणजेच वर्षाला ही व्यक्ती पोहे विकून 54 लाख रुपये कमवते.
अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत हिशोब वाढवून चढवून दाखवण्यात आल्याचा दावा केला आहे. 'मी इंदूरमध्ये 10 रुपयांना पोहे विकतो. 5 किलो विकल्यावर 700 रुपये मिळतात,' असं एकाने म्हटलं आहे. अन्य लोकांनीही हा हिशोब फारसा पटत नसल्याचं म्हटलं आहे.