Man Sets His Own House On Fire: उत्तर प्रदेशमधील कौशांबीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी माहेर गेल्याने नाराज झालेल्या पतीने स्वत:च्याच घराला आग लावली. दारुच्या नशेत या व्यक्तीने स्वत:च्या घराला आग लावल्याचं स्पष्ट झालं आहे. या दारुड्याने स्वत:च्या घराला आग लावल्यानंतर बऱ्याच कष्टाने ग्रामस्थांनी ही आग विझवली. मात्र ही आग विझवेपर्यंत घरातील सर्व लहानमोठं सामना जळून खाक झालं होतं. या प्रकरणामध्ये घर जाळणाऱ्या व्यक्तीविरोधात त्याच्याच वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी आग लागलेल्या घराची पहाणी केली असून तपासाला सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रकार चरवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काजू गावात घडला. घराला आग लावणारा दारुडा मुकुल देव हा येथील विटभट्टीवर काम करतो. हातावर पोट असलेल्या मुकुलचं कुटुंब त्यांच्या कमाईवरच जगत आहे. मुकूल हा कमावणारा एकमेव व्यक्ती असून त्यावर अवलंबून असलेल्या घरातील लोकांची संख्या अधिक आहे. 19 वर्षांपूर्वी मुकूलचं लग्न शेजारच्या शोभना गावातील फूलमती नावाच्या महिलेशी झालं. घरातील आर्थिक परिस्थिती फारच बेताची असल्याचं मुकूलने पोलिसांना सांगितलं. घरात पैसा नसतानाही पत्नी कायम पक्कं घर बांधण्याचा हट्ट करायची असं त्याने सांगितलं. याच मुद्द्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद व्हायचा. मुकुलला दारुचं व्यसन असल्याचं पोलिसांनी या दोघांच्या नातेवाईकांनी सांगितलं. पत्नी नाराज झाल्याने मंजीत (11), भीमा (7), अभिमान (6), परसराम (3) आणि कृष्णा या मुलांसहीत माहेर गेली असतानाच त्याने घराला आग लावली.
"आम्हाला राहण्यासाठी चांगलं घर नाही. पाऊस पडला की घर गळू लागतं. आम्हाला पाच मुलं आहेत. चांगलं घर नसल्याने आमचे हाल होत आहेत. माझ्या पत्नीने माझ्याशी वाद घातला आणि ती निघून गेली. त्यानंतर मी दारु पिऊन आलो आणि घराला आग लावून दिली. ती रोज माझ्याशी भांडायची. नेहमी बाहेर शौचाला जावं लागतं, फार त्रास होतो असं म्हणत ती वाद घालायची. आम्हाला रहायला घरच नाही तर काय करु? याच मुद्द्यावरुन वाद झाला. त्यानंतर ती माहेरी निघून गेली आणि मी घराला आग लावून टाकली," असं मुकुल म्हणाला.
आग लागल्याचं समजल्यानंतर गावकरी मुकुलच्या घराजवळ आले असता मोठमोठ्या आगेच्या ज्वाला चहू बाजूंनी दिसत होत्या. या प्रकरणी मुकुलविरोधात त्याचे वडील मातादीन यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुलाविरोधात कारवाई करा अशी मातादीन यांची मागणी आहे.