गुजरातच्या तरुणाने अमेरिकेत जाऊन केली आजी-आजोबांची हत्या; पोलिसांना स्वतःच दिली माहिती

Indian Student Kill Grandparents : गुजरातमध्ये एका विद्यार्थ्याने अमेरिकेत आजी आजोबांसह काकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 30, 2023, 09:22 AM IST
गुजरातच्या तरुणाने अमेरिकेत जाऊन केली आजी-आजोबांची हत्या; पोलिसांना स्वतःच दिली माहिती title=

Crime News : अमेरिकेत (US) एका भारतीयाने मुलाने आजी आजोबांसह (grandparents) काकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला न्यू जर्सी कॉन्डोमिनियममध्ये त्याच्या आजी-आजोबा आणि काकांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिडलसेक्स काउंटी अभियोक्ता कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास एका शेजाऱ्याने गोळीबाराचा  आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम ब्रह्मभट्टवर या तरुणाने 72 वर्षीय दिलीपकुमार ब्रह्मभट्ट, 72 वर्षीय बिंदू ब्रह्मभट्ट आणि 38 वर्षीय यशकुमार ब्रह्मभट्ट यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता पोलिसांना गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना घरात तीन जणांचे मृतदेह सापडले. त्यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ शेजाऱ्यांकडे चौकशी सुरु केली.

पोलिसांनी सांगितले की, दिलीपकुमार आणि बिंदू ब्रह्मभट्ट यांची त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच त्यांचा मुलगा यशकुमार ब्रह्मभट्ट यालाही अनेक गोळ्या लागल्या. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. ओम काही महिन्यांपूर्वीच न्यू जर्सीला आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ओमने गोळीबार का केला याचं कारण समोर आलेलं नाही. मात्र एका शेजाऱ्याने माध्यमांना सांगितले की घरगुती हिंसाचारामुळे काही दिवसांपूर्वी पोलीस त्यांच्या घरी आले होते. हा सगळा प्रकार अचानक घडलेला नाही यामागे काहीतरी कारण असण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयित ओमला ताब्यात घेण्यात आले. गुजरातचा रहिवासी असलेला ओम हा तिघांसोबत राहत होता. हत्येच्या घटनेनंतर ओम घरात सापडला अशी माहिती पोलिसांनी दिली. ओमने ऑनलाइन खरेदी केलेल्या पिस्तुलाने हा गुन्हा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अटकेनंतर त्याला  मिडलसेक्स काउंटी अॅडल्ट करेक्शनल फॅसिलिटीमध्ये प्री-ट्रायल डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी न्यायालयात हजर राहिल्यानंतर ओम शांत दिसत होता. पोलिसांचे दिलेल्या माहितीनुसार, ओमनेच सकाळी 911 वर कॉल केला आणि हे कोणी केले असे विचारले असता त्याने हत्येची कबुली दिली होती.