Goa Crime : गोव्यातून (Goa News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) पदावर असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांमध्ये (Delhi Police) महत्त्वाच्या पदावर असलेले आणि आता गोव्याचे पोलीस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी असलेले डॉक्टर ए कोआन (Doctor A Koan) यांनी एका क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन केले आहे. याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
लोकांचे रक्षण करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. पण पोलिस अधिकारीच गुन्हा करत असतील तर मग काय करायचे? असाच काहीसा प्रकार गोव्यातून समोर आले आहे. गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये गोवा पोलिसांचे महानिरीक्षक एका महिलेचा विनयभंग करत होते. विनयभंगामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने पोलीस महानिरीक्षकांना सार्वजनिक ठिकाणी कानाखाली मारून चांगलाच धडा शिकवला. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता पोलीस महानिरीक्षक डॉ ए कोआन यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
ही घटना गोव्यातील बागा कलंगुट बीचवरील नाईट क्लबमध्ये घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा महानिरीक्षक कोआन या क्लबमध्ये आले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कोआन यांची क्लबमधील महिलेशी बाचाबाची झाली. त्यानंतर महिलेने थेट महानिरीक्षकांच्या कानाखाली लगावली. या सगळ्या प्रकारानंतर क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला. ज्या क्लबमध्ये हा सगळा प्रकार घडला तो एका मोठ्या राजकारण्याशी संबधित असल्याचेही म्हटलं जात आहे. त्यामुळे हे प्रकरण थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहोचले होते. सध्या गोव्यात विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण तिथेही गाजत आहे.
महानिरीक्षक कोआन हे काही दिवस वैद्यकीय रजेवर असल्याचेही समोर आले आहे. मात्र वैद्यकीय रजेवर असलेले महानिरीक्षक कोआन क्लबमध्ये काय करायला गेले होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रमोद सावंत यांनी बुधवारी सभागृहात सांगितले की, असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. अधिकाऱ्याचे नाव न घेता सरदेसाई यांनी सभागृहात सांगितले की, एका महिलेने नाईट क्लबमध्ये आयपीएस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मारहाण केली होती.
दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, महानिरीक्षक कोआन यांच्याशी गैरवर्तन केल्यानंतर महिलेने नुसती कानाखाली मारली नाही तर तिने सहकाऱ्यांसह कोआन यांना मारहाणही केली. या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला असून, त्यामध्ये ते महिलेसोबत गैरवर्तन करत असल्याचे दिसून येत आहे. महानिरीक्षक कोआन हे दिल्लीत पोलीस उपअधीक्षक देखील राहिले आहेत.