गांधी परिवाराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफला हवी बुलेटप्रूफ कार

 इतक्या बुलेट प्रूफ कार नसल्याने  सीआरपीएफसमोर अडचण निर्माण झाली आहे. अशावेळी एसपीजीकडील कार मिळावी यासाठी मागणी करण्यात आली आहे. 

Updated: Nov 19, 2019, 08:49 AM IST
गांधी परिवाराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफला हवी बुलेटप्रूफ कार  title=

नवी दिल्ली : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना मिळणारी एसपीजी सुरक्षा हटवल्यानंतर सीआरपीएफने गांधी परिवाराच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. सीआरपीएफने गांधी परिवाराला सुरक्षा देण्यासाठी ६ कंपन्या तैनात केल्या आहेत. पण  इतक्या बुलेट प्रूफ कार नसल्याने  सीआरपीएफसमोर अडचण निर्माण झाली आहे. अशावेळी एसपीजीकडील कार मिळावी यासाठी मागणी करण्यात आली आहे. 

यासंदर्भात सीआरपीएफने गृह मंत्रालय आणि एसपीजीकडे बुलेट प्रूफ कार देण्याची मागणी केली आहे. एसपीजीची बुलेट प्रूफ कार तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत आणि इतर कारच्या तुलनेत खूपच उजवी आहे. याआधी सीआरपीएफने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची एसपीजी काढून सीआरपीएफ झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यावेळी सीआरपीएफने एसपीजीने तैनात केलेल्या बुलेटप्रूफ गाड्या आपल्या ताब्यत देण्याची मागणी केली होती. सरकारतर्फे ती मंजूर करण्यात आली होती. 

सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथील आवासावर इस्त्रायल एक्स-९५, एके सीरीज आणि एमपी-५ बंदूकांसोबत केंद्रीय अर्ध्वसैनिक कमांडोंच्या २ तुकड्या आपल्या सुरक्षेची जबाबदारी संभाळत आहेत. याचप्रमाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या तुगलक लेन निवास आणि प्रियांका यांच्या लोधी इस्टेट येथील निवासस्थानी सैन्यबल तैनात आहे.

महत्त्वाच्या व्यक्तींना असलेल्या सुरक्षेबाबत आणि त्यांना असलेल्या धोक्याबाबत ठराविक कालावधीनंतर आढावा घेतला जातो. यावेळीही अशाच प्रकारचा आढावा घेण्या आला आणि गांधी परिवाराला धोका नसल्याचं समोर आलं, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा या ४ व्यक्तींनाच भारतात एसपीजी सुरक्षा देण्यात येते. एसपीजी सुरक्षेमध्ये ३ हजार अधिकारी कार्यरत असतात. १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या करण्यात आल्यानंतर गांधी कुटुंबाला एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. तर १९८५ साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबासाठी एसपीजीची स्थापना करण्यात आली होती.