'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?

शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..

Updated: Apr 12, 2023, 08:34 PM IST
'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल? title=

School Credit Score : तुमच्या मुलांचा क्रेडिट स्कोर काय, असा प्रश्न कुणी विचारला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आता लवकरच विद्यापीठांप्रमाणे शाळांमध्येही  मूल्यमापनासाठी (Evaluation) श्रेयांक पद्धत अर्थात क्रेडिट सिस्टीम (Credit System) लागू केली जाणार आहे. शाळा (School), महाविद्यालय (College) आणि उच्च महाविद्यालयांमध्ये (Higher Colleges) एकच शिक्षण पद्धती असावी, यासाठी सध्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्याची सूचना राष्ट्रीय अभ्यासक्रम (National Curriculum) आराखड्यात करण्यात आलीय. 

'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य?
यापुढं पहिली ते पदवीपर्यंत क्रेडिट सिस्टीमनं मूल्यमापन केलं जाईल. अभ्यासासोबत कला, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठीही क्रेडिट गुण (Credit Score) दिले जातील. विद्यार्थ्यांना वर्षभरात 800 ते 1200 शैक्षणिक तास पूर्ण करावे लागतील. 800 तासांसाठी 27 क्रेडिट, 1000 तासांसाठी 22 क्रेडिट आणि1200 तासांसाठी 40 क्रेडिट गुण दिले जातील. क्रेडिटनुसार विद्यार्थ्यांची रँक निश्चित होईल. केवळ मूल्यमापनाच्या पद्धतीत नाही, तर शाळेतचा युनिफॉर्म, वर्ग आणि वर्गातील आसन व्यवस्थेमध्येही बदल केले जाणार आहेत.

युनिफॉर्म, वर्गात बसण्याच्या पद्धतीतही बदल? 
शाळेचा युनिफॉर्म आधुनिक असावा, रंग आणि डिझाईन आकर्षक असावी. विद्यार्थ्यांनी सतरंजीवर आणि शिक्षकांनी खुर्चीवर बसण्याची प्रथा रद्द करावी. मुख्याध्यापकांना विशिष्ट कपमध्ये चहा देण्याची प्रथाही रद्द करावी वर्गात मुलांना अर्ध वर्तुळात किंवा गटागटानं बसवावं
हुशार विद्यार्थ्यांना पहिल्या बेंचवर बसवण्याची प्रथा बंद करावी. शाळांमधील संमेलनं अधिक सर्जनशील असावीत, अशा सूचनाही राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आल्यात.

केंद्र सरकारनं नेमलेल्या ११ सदस्यांच्या समितीनं हा आराखडा तयार केलाय... त्यावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांची मतं मागवण्यात आलीयत. त्यानंतर या शिफारसी मान्य करायच्या किंवा कसे, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणाराय.

आर्ट्स, कॉमर्स मोडीत?
दरम्यान एकाच वेळी अनेक विषयांचं शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आली आहे. नव्या धोरणानुसार आर्टस्, कॉमर्स, सायन्स मोडीत निघेल, विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही. आठ विद्याशाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात येणार असून विद्यार्थी एकूण 16 विषय निवडू शकतील. मात्र किमान 4 विषय एकाच विद्याशाखेतले निवडणं बंधनकारक असेल. याशिवाय 10 वी, 12 वीची बोर्ड सिस्टीम संपवण्यात येईल आणि 9 वी ते 12 वी शिक्षण एकसंध असेल. 

शिक्षणात सुसुत्रता यावी, विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण घेता यावं यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतय. आता विद्यार्थी आणि पालकांना नवा बदल रूचणार का? हेच पाहावं लागेल.