Cow Cess : हिमाचल प्रदेश सरकारने (Himachal Pradesh) दारू विक्रीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, दारूच्या प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता (Cow Cess) अधिभार लावण्यात येणार आहे. शुक्रवारी हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी राज्याचं बजेट सादर केलं. यावेळी त्यांनी दारूवर गोमाता अधिभार (Cow cess) लावण्याचा मोठा निर्णय घेतला.
शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. यामध्ये राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार लावण्यात येणार आहेत. प्रत्येक दारूच्या बाटलीमागे दहा रुपये गोमाता अधिभार लावल्यास राज्य सरकारला वर्षाला 100 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याकडे अर्थ मंत्रिपद आहे. यावेळी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सांगितलं की, हा अर्थसंकल्प औपचारिक नसून राज्याला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प असणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 50 टक्के अनुदान दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री सुखू यांनी सांगितलं की, हिमाचल प्रदेशापूर्वी इतर अनेक राज्यांमध्येही गोमाता अधिभार वसूल केला जातो. पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि चंदीगड या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे. मात्र, या राज्यांमध्ये हा अधिकार मद्याव्यतिरिक्त इतर वस्तूंवर लावला जातो.