दिलासादायक! देशात ५४४ दिवसांनंतर कमी सक्रीय रुग्णांची नोंद, गेल्या २४ तासात सापडले 'इतके' कोरोना रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कमी सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. हा आकडा ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे.  

Updated: Nov 29, 2021, 10:51 AM IST
दिलासादायक! देशात ५४४ दिवसांनंतर कमी सक्रीय रुग्णांची नोंद, गेल्या २४ तासात सापडले 'इतके' कोरोना रुग्ण title=

Corona Upate : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron)जगभरात पुन्हा भीतीचं वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने चिंतेत भर टाकली आहे. असं असलं तरी भारतात सध्या दिलासादायक चित्र आहे. देशात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची ८ हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत.  तर ९ हजारांहून अधिक लोक बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, या कालावधीत 236 जणांचा मृत्यू झाला. 

सक्रिय रुग्णसंख्येत घट
दिलासादायक म्हणजे सक्रिय प्रकरणांमध्येही सातत्याने घट होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोनाचे १ लाख ३ हजार ८५९ सक्रिय रुग्ण आहेत. हा आकडा ५४४ दिवसांनंतरचा सर्वात कमी आहे.  भारतात आतापर्यंत 4 लाख 68 हजार 790 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या नवीन प्रकाराने चिंता वाढवली आहे. भारतातही कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे.

काही राज्यात परिस्थिती चिंताजनक
अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत आहे.  केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, गुजरातसह इतर राज्यांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार आहे.  महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका वृद्धाश्रमात 50 हून अधिक जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर केरळमध्येही कोरोना बाधित रुग्ण सतत दिसू लागले आहेत.

ओमिक्रॉनची जगभरात दहशत
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे संपूर्ण जग दहशतीत आहे. भारत सरकारही या नव्या प्रकाराबाबत सावध झालं आहे. जगभरातील अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. युरोपपासून सर्व देश खबरदारीच्या उपाय योजना आखत आहेत. ओमिक्रॉन सतत रुप बदल असल्याने वॅक्सिनबाबतही तज्ज्ञांना साशंकता आहे.