लवकरच 'स्पुटनिक व्ही' लस मिळणार मोफत, सरकारची अशी आहे तयारी

सध्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन भारतीय बनावटीच्या लस देशात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात वापरल्या जात आहे.  

Updated: Jul 6, 2021, 11:18 AM IST
लवकरच 'स्पुटनिक व्ही' लस मिळणार मोफत, सरकारची अशी आहे तयारी   title=

मुंबई : सध्या कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन भारतीय बनावटीच्या लस देशात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात वापरल्या जात आहे. दरम्यान, रशियन लस स्पुटनिक (Sputnik V Vaccine) देखील खासगी रूग्णालयात फी आकारली जात आहे. परंतु आता लवकरच लोकांना सरकारी रुग्णालयातही स्पुटनिकची लस मोफत दिली जाईल. तशी सरकारने तयारी सुरु केली आहे.

मोफत स्पुटनिक लस

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, स्पुटनिक ही लस मोफत दिली जाणार आहे. ही तिसरी कोरोना लस असणार आहे. सरकारच्या कोरोना वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष एनके अरोरा म्हणाले की, लवकरच सरकारी लसीकरण केंद्रात लोकांना स्पुटनिक लस मोफत देण्याची तयारी सुरू आहे.

सध्या, स्पुटनिक लसचा पुरवठा कमी आहे. आणि ही लस केवळ खासगी केंद्रांवर उपलब्ध आहे. जिथे या स्पुटनिक लसीसाठी पैसे मोजावे लागत आहेत. डॉ. अरोरा म्हणाले की, सरकार आपला पुरवठा वाढवण्याच्या दिशेने काम करीत आहे आणि लवकरच स्पुटनिक ही लस मोफत लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग असेल.

लसीकरण पोलिओसारखे असेल

रशियन लस स्पुटनिकच्या साठा करण्याबाबत मोठी समस्या आहे. कारण ती ठेवण्यासाठी उणे 18 अंश तपमान आवश्यक आहे. यासंदर्भात डॉ. अरोरा यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने पोलिओ लसीसाठी कोल्ड चेनची व्यवस्था केली गेली होती. त्याप्रमाणे स्पुटनिकची साठवणही त्याच धर्तीवर केले जाईल. त्याचबरोबर ते म्हणाले की ग्रामीण भागातही या लसीचा पुरवठा केला जाणार आहे. 

लसीकरणाच्या गतीच्या व्यत्ययाबद्दल डॉ. अरोरा म्हणाले की, आगामी काळात पुन्हा हे काम वेगवान केले जाईल. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत 34 कोटीहून अधिक डोस देण्यात आले असून जुलैपर्यंत 12 ते 16 कोटी डोस देण्याची योजना आहे. ते म्हणाले की दररोज एक कोटी लस डोस देण्याची तयारी सुरू आहे.