कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात पार पडला अभूतपूर्व 'जनता कर्फ्यू'

मोदींच्या संकल्पनेला देशातील जनतेचा भरभरुन प्रतिसाद   

Updated: Mar 22, 2020, 09:05 PM IST
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात पार पडला अभूतपूर्व 'जनता कर्फ्यू' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोना Corona व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. पंतप्रधानांनी दिलेली हीच साद ऐकत रविवारी संपूर्ण देशभरातील नागरिकांनी घरातच राहत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

नेहमीच गर्दी असणाऱ्या, वाहनांची वर्दळ असणाऱ्या अनेक ठिकाणांवर कर्फ्यूदरम्यान शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेल्या या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत नागरिकांनी कोरोनाविरोधातील या लढ्यात सहकार्य केलं. मुंबई, दिल्ली, नागपूरसह बऱ्याच ठिकाणी आणि ग्रामीण भागांमध्येही नागरिकांनी घराबाहेर येणं प्रकर्षाने टाळलं. आजवर कधीच न पाहिलेलं दृश्य सर्वत्र पाहायला मिळालं. 

जनता कर्फ्यूसोबतच पंतप्रधानांनी आणखी एका गोष्टीसाठीसुद्धा देशवासियांच्या सहभागाची विचारणा केली होती. कोरोना व्हायरसशी लढा देत असतानाच या संघर्षाच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी आणि शासकीय, पालिकेच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आभार व्यक्त आवाहन मोदींनी केलं. त्यांच्या या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर, गॅलरी, बाल्कनी, गच्चीमध्ये येत टाळ्यांचा कडकडाट सुरु केला. 

पाहा : शुकशुकाट! गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'जनता कर्फ्यू'

काहींनी थाळीनाद आणि घंटानाद करत आपल्यासाठी नि:स्वार्थ सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींचे आभार मानले. राजकारणात अनेकदा मतभेद असणाऱ्या राजकीय नेतेमंडळींनीही यावेळी कृतज्ञतेचा हा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. 
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये गर्दी टाळण्यासाठी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वयंशिस्तीनेच नागरिकांनी आपलं सहकार्य करावं असं आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.